‘दररोज एकच जिनिंग सुरू ठेवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:54 IST2020-02-16T23:53:18+5:302020-02-16T23:54:30+5:30
तालुक्यातील पाच शासकीय केंद्रापैकी दररोज एकच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना कापूस उत्पादक पणन खात्याने काढल्या आहेत. या कारभारामुळे शेतकऱ्यांना जिनिंगवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

‘दररोज एकच जिनिंग सुरू ठेवा’
पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील पाच शासकीय केंद्रापैकी दररोज एकच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना कापूस उत्पादक पणन खात्याने काढल्या आहेत. या कारभारामुळे शेतकऱ्यांना जिनिंगवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. त्यांना कापूस खाजगी खरेदीदारांना कमी भावात देण्याची वेळ आली आहे.
तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असून, भौगोलिक क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गत अडीच महिन्यात १२ जिनिंगवर ३ लाख ६६ हजार २६२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पैकी २ लाख २० हजार २३७ क्विंटल खरेदी ही शासकीय, तर १ लाख ४६ हजार क्विंटल खरेदी खाजगी केंद्रावर झाली आहे. शासकीय केंद्रावर " ५११० ते ५५००, तर खाजगी केंद्रावर " ४७०० ते ५००० या भावाने खरेदी करण्यात येत आहे.
माजलगाव तालुक्यात ७ जिनिंगवर कापसाची शासकीय खरेदी होत असून, हे खरेदी केंद्र सुरू होऊन ८० दिवस झाले आहेत. स्टॉकच्या नावावर अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने केवळ ३५ दिवसच हे केंद्र सुरू असल्याची माहिती येथील बाजार समितीने दिली. कापून उत्पादक पणन महासंघाकडून वारंवार शासकीय खरेदी केंद्र बंद ठेवल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
पणन खात्याने ७ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात दररोज एकाच शासकीय खरेदी केंद्रावर कापसाची खरेदी करण्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत १० ते १२ हजार क्विंटलची आवक असून, दररोज ५०० छोटी - मोठी वाहने जिनिंगवर येत आहेत. यापैकी एका जिनींगवर दररोज केवळ १०० वाहनांमधील कापसाचे माप होत आहे. केवळ दोन ते अडीच हजार क्विंटलची कापसाची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मापासाठी ८-८ दिवस वाट पहावी लागत आहे. यामध्ये शेतक-यांचे वेळेसोबतच आर्थिक नुकसानही होत आहे.
कापूस प्रश्नी चाललेली शेतकºयांची थट्टा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.