बीडमध्ये दुष्काळाला संधी मानत शेतकऱ्याने टरबूज शेतीतून घेतले लाखोचे उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:25 PM2018-11-15T12:25:14+5:302018-11-15T12:25:49+5:30

निसर्गाने साथ दिल्याने टरबुजातून मिळणाऱ्या उत्पन्नाने कपाशीला मागे टाकले.

Considering the opportunity for drought in Beed, the farmer gains millions from watermelon farming | बीडमध्ये दुष्काळाला संधी मानत शेतकऱ्याने टरबूज शेतीतून घेतले लाखोचे उत्पन्न 

बीडमध्ये दुष्काळाला संधी मानत शेतकऱ्याने टरबूज शेतीतून घेतले लाखोचे उत्पन्न 

Next

यशकथा : 

- अनिल भंडारी (बीड)

दुष्काळाची चिंता करीत बसण्यापेक्षा झगडण्याची जिद्द बाळगत शिरूर तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील विशाल वसंत राख या तरुण शेतकऱ्याने टरबूज शेतीचा प्रयोग केला. निसर्गाने साथ दिल्याने टरबुजातून मिळणाऱ्या उत्पन्नाने कपाशीला मागे टाकले. 

बीडपासून २६ कि.मी. अंतरावर कमळेश्वर धानोरा येथे विशालची ४ एकर शेती आहे. ३ एकरांत पांढरे सोने म्हणून कपाशीची लागवड केली. बियाणांपासून मशागत, वेचणीवर १० हजार रुपयांच्या पुढे खर्च केला. पाच महिन्यांत आजच्या बाजारभावानुसार ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा जूनपासूनच पाऊसमान कमी असल्याचे भान राखत हीच संधी ओळखून कपाशीशिवाय उरलेल्या एका एकरात जुलैमध्ये टरबुजाची शेती करण्याचा निर्णय घेतला. जॉय, कृष्णा, ब्लॅकबॉस वाण निवडले. नांगरट, बेड, बियाणे, खतांवर ३० हजार रुपये खर्च केले. ठिबक आधीचेच होते.

खरिपाची पिके सोडून पावसाळ्यात काय टरबुजाचे पीक घेतो म्हणून काहींनी नावे ठेवली. लोक हसायचे; पण त्याकडे दुर्लक्ष करीत विशाल, त्याची आई, आजी व आजोबा सर्जेराव राख यांनी सांभाळ केला. विशाल स्वत: बीएस्सी कृषी पदवीधारक असल्याने बेड आणि ड्रीप मॅनेजमेंट सांभाळले. अवघ्या दोन महिन्यांत हाती फळ लागले. टरबुजाचे एक फळ ३ ते ६ किलोचे आले.

हैदराबादच्या व्यापाऱ्याने टरबुजांची पाहणी करीत जागेवरच १५ रुपये किलोचा भाव दिला. ९ टन टरबूज खरेदी केले, तर बीडच्या अडत बाजारात ३७ कॅरेट (२५ किलोचे एक कॅरेट) विकले. यातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आणखी ६ टन टरबुजाचे पीक होण्याची शक्यता असून, यातून ६० हजार रुपयांचे उत्पन्न होईल, पुणे, वाशी मार्केटमधून मागणी असल्याचे विशाल म्हणाला.

टरबुजाचे एवढे पीक घेऊनही विशाल राख यांनी वेल तशीच ठेवली आहे. त्यामुळे पुन्हा फलधारणा होत आहे. परिणामी, दुप्पट उत्पादन होईल, असा त्यांचा अंदाज आहे. पाण्याची अडचण असली तरी मिळणारे फळ काहीसे कमी पोसले जाईल, असा अंदाज आहे. टरबुजाच्या पिकातच गवार आणि वांग्याचे आंतरपीक त्यांनी घेतले आहे.

यासाठी केवळ ४५० रुपये खर्च त्यांनी केला आहे. यातून ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न राख यांचा आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन, हे सूत्र अवलंबित आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधणारे राख कुटुंबिय घरच्या घरीच खत तयार करतात. शेणखत, गूळ, बेसनपीठ, गोमूत्राचा वापर करुन तयार केलेल्या शिवामृतमुळे ‘खर्चात बचत, त्याचबरोबर उत्पन्नाची हमी’ असा संयोग साधण्याची किमया या कुटुंबाने परिश्रमातून करून दाखवली आहे. 

Web Title: Considering the opportunity for drought in Beed, the farmer gains millions from watermelon farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.