बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:15 IST2020-01-09T00:15:15+5:302020-01-09T00:15:52+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
बीड : केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान जिल्हाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन झाले, तर ग्रामीण भागात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस सामान्य जनतेचे जगणे अवघड होत आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, समान काम समान वेतन द्यावे, देशभर जुनी पेंशन योजना लागू करावी, अर्धवेळ, ठोक वेतन, सामाजिक सुरक्षितता निर्माण करावी, कामगार कायद्यामध्ये करण्यात येणारे कामगार विरोधी अन् मालकाधार्जिणे बदल त्वरीत थांबवावेत, यासह इतर मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान कामगार-कर्मचारी-शिक्षक समन्वय समिती, एआयटीयूसी, सीटू, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, बँक फेडरेशन, विमा आणि जनरल विमा फेडरेशन, इंटक, एचएमस असंघटीत मजदूर पंचायत, पी अॅन्ड टी कर्मचारी युनियन, हमाल मापाडी युनियन, लालबावटा शेतकरी संघटना, यासह इतर संघटनांनी जिल्हाभरात आंदोलन केले. तसेच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थी संघटनेच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल
बीड येथे एसएफआयच्या वतीने शैक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आंदोलन करण्यासाठी एसएफआय संघटनेचे पदाधिकारी गेले होते.
यावेळी त्यांनी कॉलेज बंद करण्याचे आवाहन केले. परंतु पोलिसांच्या माहितीनुसार या आंदोलनाची परवानगी संघटनेने घेतली नव्हती. तरी देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मोहन माणिक जाधव, दत्ता बाबासाहेब प्रभाळे, रोहिदास शेकू जाधव, दत्ता सीताराम भोसले, गोपीनाथ बन्सी गायकवाड, प्रकाश नवनाथ उजगरे यांच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.