बाबा चला या, घाबरू नका! नोंदणी करून लस घ्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:14+5:302021-03-10T04:33:14+5:30
रिॲलिटी चेक सोमनाथ खताळ बीड : जिल्हा रुग्णालयासारख्या मोठ्या संस्थेत ज्येष्ठांना कोरोना लसीसाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते; परंतु नायगाव ...

बाबा चला या, घाबरू नका! नोंदणी करून लस घ्या..
रिॲलिटी चेक
सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रुग्णालयासारख्या मोठ्या संस्थेत ज्येष्ठांना कोरोना लसीसाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते; परंतु नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिस्थिती वेगळी आहे. येथे लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांना सन्मान तर दिलाच जात आहे; परंतु लस घेताना आधार दिला जात असल्याचे दिसते. बाबा चला या, घाबरू नका! नोंदणी करून लस घ्या.. असे म्हणत पथकाकडून त्यांना धीर दिला जात आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला घेण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून कोमाॅर्बिड आजार असलेले ४५ वर्षांच्या पुढील व ६० वर्षांची पुढील सरसकट नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रातही लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. हाच धागा पकडून पाटोदा तालुक्यातील नायगाव आरोग्य केंद्रात मंगळवारी 'लोकमत'ने 'रिॲलिटी चेक' केले. यात जागा अपुरी असतानाही योग्य नियोजन करून लसीकरण केले जात होते. आल्यावर बसण्याची व्यवस्था, नोंदणी, लसीकरण आणि निरीक्षण कक्ष असे नियोजन येथे केले होते. विशेष म्हणजे प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळी केंद्रात येणाऱ्यांचे मन प्रसन्न करीत होत्या.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मदनराव काकड, डॉ.गणेश गुंड, डॉ.सारिका माने, गटप्रवर्तक एस.के.लगास, आरोग्य सहायक अंबादास पवळ, सहाय्यीका ए.जे.करवा, मंगल मिसाळ, सिद्धार्थ फुलवरे, राजेंद्र सानप, अखिल पठाण, सय्यद निसार आदी येथे तत्पर कर्तव्य बजावत होते.
एका दिवशी एक गाव
लसीकरणात गर्दी होऊ नये, यासाठी एका दिवशी एकच गाव ठेवले आहे. या गावाचे नियोजन संबंधित सीएचओ, परिचारिका, आशा, अंगणवाडी सेविकांनी करण्याच्या सूचना केेलेल्या आहेत. लाभार्थ्यांना ने-आण करण्याची व्यवस्था सरपंचांशी बोलून करण्यात आली आहे. मंगळवारी डोमरी गावाचे लसीकरण झाले.
अपुरी जागा अन् भंगार रुग्णवाहिका
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या या आरोग्य केंद्रात कायम गर्दी असते; परंतु येथे अपुरी जागा आहे. आयपीडी, ओपीडी काढताना अडचणी येतात, तसेच रुग्णांना ने-आण करणारी रुग्णवाहिकाही भंगार झाली आहे. तिच्या दुरुस्तीतच हजारोंचा खर्च होत आहे.
लोकसहभागाचीही थोडी गरज
येथे अपुरी जागा आहे. त्यामुळे प्रतीक्षा कक्ष व नोंदणीसाठी पत्र्याचे शेड करण्याचे नियोजन आहे; परंतु यासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येत आहे. यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे सामान्यांना आणखी सुविधा मिळतील.
८० प्रसूती अन् ७० शस्त्रक्रिया
एवढी अपुरी जागा आणि इमारतीचा प्रश्न असतानाही येथे २०२१ मध्ये ८० प्रसूती झाल्या आहेत, तसेच ७० विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ.काकड व डॉ.गुंड यांच्या समन्वयाने या केंद्राने कायाकल्पमध्येही यश संपादन केलेले आहे.
===Photopath===
090321\092_bed_3_09032021_14.jpeg
===Caption===
ज्येष्ठांना लस देताना डॉ.मदनराव काकड, डॉ.गणेश गुंड, डॉ.सारीका माने व त्यांचे पथक दिसत आहे.