बोधेगावात ढगफुटीसारखा पाऊस, ओढ्यात अडकलेल्या तिघांना सुखरूप वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:52+5:302021-06-04T04:25:52+5:30
परळी : तालुक्यातील बोधेगाव परिसरात बुधवारी रात्री दहाच्यासुमारास ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे बोधेगावच्या ओढ्यास पाणी आले. ...

बोधेगावात ढगफुटीसारखा पाऊस, ओढ्यात अडकलेल्या तिघांना सुखरूप वाचविले
परळी : तालुक्यातील बोधेगाव परिसरात बुधवारी रात्री दहाच्यासुमारास ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे बोधेगावच्या ओढ्यास पाणी आले. ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या एका कारमधील तिघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून बोधेगावचे माजी सरपंच व परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक माऊली गडदे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.
बुधवारी रात्री दहाच्यासुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. बोधेगावजवळील ओढ्यातील पाण्यात कासारी बोडखा या गावाकडे जाणारी कार फसली. या कारमध्ये अंबाजोगाई येथील रुग्णालयात सिझर झालेली महिला, तिचा पती व तीन दिवसांचे बाळ होते. वाढत्या पाण्यामुळे कारच्या स्टेरिंगपर्यंत पाणी आले होते. कारमध्ये महिला व तीन दिवसांचे बाळ, तर पती कारच्या टपावर थांबलेला होता. कारमधील महिलेने दिंद्रुड ठाण्यात कार्यरत असलेल्या भावाला ही बाब कळविली. त्याने सिरसाळा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांना कळविल्यानंतर विघ्ने यांनी बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचविण्याचे आवाहन केले. माऊली गडदे स्वत:चे वाहन घेऊन ओढ्यापर्यंत आले. त्यानंतर पाण्यात उतरले. आरडा ओरड करून गावकऱ्यांना बोलावले. ट्रॅक्टरमधून आलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने ओढ्याच्या पाण्यातून तिघांना सुखरूप बाहेर काढले, तर त्यांची कार वाहून जाऊ नये म्हणून झाडाला बांधून ठेवली. गुरुवारी पहाटे ओढ्याचे पाणी ओसरले.
बोधेगाव परिसरात बुधवारी रात्री तुफान पाऊस झाला. आपण पहिल्यांदाच एवढा मोठा स्वरूपाचा पाऊस पाहिला. या पावसाच्या पाण्यात एक कार अडकली होती. कारमध्ये तिघेजण होते. या तिघांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. - माऊली गडदे, माजी सरपंच, बोधेगाव, परळी.