सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:50 IST2025-01-17T05:45:49+5:302025-01-17T05:50:01+5:30
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे.

सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार
बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला सीआयडीने गँगचा लीडर दाखविले आहे, तर वाल्मीक कराडला सदस्य केले आहे. कराडला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारीदेखील बदलण्यात आले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. परंतु, आता गुजर यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरचे अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. ६ डिसेंबरच्या मारहाण व ॲट्रॉसिटीचा तपासही पाटील यांच्याकडे दिला आहे. खंडणीचा तपास गुजर यांच्याकडे कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धनंजय देशमुख यांचा आज जबाब घेणार
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे. धनंजय यांचा जबाब शुक्रवारी घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हत्येच्या दिवशी कराड-चाटे यांचा कॉल
सीआयडीने आरोपींचे कॉल डिटेल्स काढले आहेत. यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड व चाटे यांच्यात कॉल झाले आहेत. त्यांच्या आवाजाचे नमुने छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.