प्रॉपर्टीसाठी पोटची मुलेच टपलीत जीवावर; बीडमध्ये ज्येष्ठ नागरिक वैतागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 11:58 IST2017-12-19T11:46:09+5:302017-12-19T11:58:30+5:30
मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे.

प्रॉपर्टीसाठी पोटची मुलेच टपलीत जीवावर; बीडमध्ये ज्येष्ठ नागरिक वैतागले
बीड : मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त ज्येष्ठांच्या वाढत्या तक्रारीवरून ही बाब समोर आली आहे. यावरून समाजात संयुक्त कुटुंब दिसत असले तरी चार भिंतीतील वाद गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे.
‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हातार्या’ असे म्हणत कैलास राऊत या मुलाने नारायण राऊत या ८० वर्षीय आपल्या जन्मदात्या बापावरच कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना ९ डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील पाली येथे घडली होती. हा दुर्दैवी बाप जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. हीच घटना डोळ्यासमोर ठेवून पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्प लाईनकडे आलेल्या तक्रारीचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. मागील चार महिन्यांत ७७४१०९३००० या हेल्पलाईनवर २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ९० टक्के तक्रारी मुलांकडून प्रॉपर्टीसाठी होत असलेल्या त्रासाच्या आहेत. अधीक्षक कार्यालयाकडून निरसनही करण्यात आल्याचे फौजदार दीपाली गित्ते म्हणाल्या.
अशा आहेत तक्रारी...
शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांनी प्लॉट, फ्लॅट, उद्योग व्यवसाय यासंदर्भात मुलांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी आहेत, तर ग्रामीण भागातील ज्येष्ठांकडून शेती, दागिने व घर या संदर्भात तक्रारी सर्वाधिक आहेत.
असे केले जाते निरसन
अधीक्षक कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार होते. संबंधित पोलीस स्टेशनला ही तक्रार वर्ग केली जाते. तसेच तिचा पाठपुरावा होतो. आठवडाभरातच ती निकाली काढली जाते. समस्या गंभीर असेल तर गुन्हा दाखल होतो अन्यथा समेट घडवून आणत वाद मिटविला जातो. दरम्यान, आतापर्यंत किती लोकांपर्यंत गुन्हे दाखल झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पोलिसांकडून ज्येष्ठांना आधार
चार महिन्यांपूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती पुस्तिका व हेल्प लाईन क्रमांकाचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ज्येष्ठांना ज्येष्ठांना माहिती देण्याबरोबरच तक्रारी निरसन करण्याचा विश्वास दिला होता. त्या आधारावरच ज्येष्ठ तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.
गल्लीतल्या मुलांकडूनही चेष्टा
ज्येष्ट नागरिकांना घरात बसून अनेकवेळा करमत नाही. त्यामुळे थोडासा व्यायाम आणि विरंगुळा व्हावा, यासाठी ते घराबाहेर पडतात. परंतु बाहेर पडल्यानंतर गल्लीतल्या लहान मुलांच्या चेष्टेला त्यांना सामोरे जावे लागतात. तरूण, युवक व लहान मुले त्यांची चेष्टा करीत असल्याच्या तक्रारींचा आकडाही ५ टक्केच्यावर आहे. लहान मुले, तरूणांकडून होणारी चेष्टा ज्येष्टांसाठी त्रासहदायक ठरू पहात आहे.
तक्रारी सोडवण्यावर भर
तक्रार प्राप्त होताच संबंधित ठाण्याकडे ती वर्ग करून आठवडाभरात तिचे निरसन केले जाते. ज्येष्ठांकडून तक्रारी वाढत आहेत. त्या सोडविल्याही जात आहेत. कुणाला त्रास होत असेल तर तात्काळ ७७४१०९३००० या क्रमांकावर संपर्क साधावा.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक