शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:21 IST2020-01-01T23:20:27+5:302020-01-01T23:21:32+5:30
सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे.

शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे आव्हान
बीड : सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी या पदासह गटशिक्षणाधिकाऱ्यांची दहा पदे रिक्तच आहेत. नव्या वर्षात शिक्षण विभागाच्या प्रशासनातील विस्कटलेली घडी व्यस्थित करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनापुढे आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक उपक्रम, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रशासकीय कामाकाजासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिपूर्ण अस्थापना आवश्यक असते. परंतू गेल्या काही वर्षांपासून महत्वाच्या असलेल्या शिक्षण विभागाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची अनास्था राहिली. त्यामुळे या विभागात अनेकदा अवमेळ दिसून आला.
शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांच्या बदलीनंतर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला. नंतर राजेश गायकवाड यांच्याकडे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार आला. त्यांच्या रजेच्या काळात पुन्हा सोनवणे यांच्याकडे पदभार आला. गायकवाड रुजू झाले तर माध्यमिक विभागाचे सोनवणे यांची लातूरला बदली झाली. त्यामुळे माध्यमिक विभागाचा पदभार नजमा सुलताना यांच्याकडे आला. दरम्यानच्या काळात सप्टेंबरमध्ये शासनाने बीड येथे प्राथमिक विभागात उपशिक्षणाधिकारी पदी सुदाम राठोड यांची नियुक्ती केली. त्यानंतर महिनाभरातच न्यायालयीन प्रकरणात दोषी आढळल्याने शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त होते. तात्पुरती व्यवस्था म्हणून उपशिक्षणाधिकारी सुदाम राठोड यांच्याकडे शिक्षणाधिका-याचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मात्र चार महिन्यातच राठोड हे सेवानिवृत्त झाल्याने उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारीचे पद रिक्त झाले आहे.
आज निर्णय : पुन्हा प्रभारी राज
तात्पुरती व्यवस्था म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारीचा पदभार कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.माध्यमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी नजमा सुलताना, प्रभारी उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, वडवणीच्या गटशिक्षणाधिकारी मिनाज पटेल आणि शालेय पोषण आहार अधीक्षक अजय बहिर यांचे प्रस्ताव वरिष्ठांपुढे सदर झाले आहेत. त्यावर गुरुवारपर्यंत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सध्याची रिक्त १६ पदे
शिक्षणाधिकारी ३ - माध्यमिक व प्राथमिक, निरंतर
उपशिक्षणाधिकारी ३ -माध्यमिक १ व प्राथमिक २
गटशिक्षणाधिकारी १०
(या रिक्त पदांवर प्रभारीच काम पाहत आहेत, तर वडवणी येथे एकमेव पदाच्या गटशिक्षणाधिकारी आहेत.)