क्रीम ठाण्यांसाठी जोरदार रस्सीखेच, राजकीय हस्तक्षेप रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:08+5:302021-08-12T04:38:08+5:30
बदल्यांचे वारे : इच्छुक पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडे लॉबिंग बीड : जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे जोरजोरात वाहू लागले आहे. ...

क्रीम ठाण्यांसाठी जोरदार रस्सीखेच, राजकीय हस्तक्षेप रोखण्याचे आव्हान
बदल्यांचे वारे : इच्छुक पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडे लॉबिंग
बीड : जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे जोरजोरात वाहू लागले आहे. २८ पैकी जवळपास निम्म्या ठिकाणचे ठाणेप्रमुख बदलले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणेप्रमुख म्हणून संधी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. क्राईम ठाण्यांसाठी अधिक चुरस असल्याची माहिती आहे. काही जणांनी लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेऊन लॉबिंग सुरू केले आहे. बदल्या व नियुक्त्यांमधील राजकीय हस्तक्षेप रोखण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांसमोर राहील.
कोरोना संसर्ग व महापुराच्या संकटामुळे दोनवेळा बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता शासनाच्या सामान्य प्रशासनाने १४ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला आहे. जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. बदल्यांसाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून यापूर्वीच विनंती अर्ज मागविलेले आहेत, तर जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण झालेल्यांच्या प्रशासकीय बदल्या होणार आहेत.
काहींचा ठाण्यातील कार्यकाल संपत आला आहे, तर काही जिल्ह्याबाहेर बदलून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे. बदल्यांना दोन वेळा मिळालेल्या मुदतवाढीने आता इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, २८ ठाण्यांपैकी जवळपास निम्म्या ठाण्यांचे प्रमुख बदलले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे. ज्या अधिकाऱ्यांचा ठाण्यातील कार्यकाल संपलेला आहे, पण जिल्ह्यातील कार्यकाल बाकी आहे, त्यांनी नवीन ठाण्यात नियुक्तीसाठी जोर लावला आहे, तर जिल्ह्यात येण्यास इच्छुक असलेल्यांनी आधीपासूनच फिल्डिंग लावून ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. बदल्या, नियुक्त्या हा सगळा पोलीस दलांतर्गत प्रशासकीय भाग आहे; पण मर्जीतील अधिकाऱ्याच्या मनासारख्या नियुक्तीसाठी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. हा हस्तक्षेप रोखण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्यासमोर असेल.
तसेच पारदर्शक प्रक्रिया राबवून नियुक्त्यांसाठी राजकीय नेत्यांकडे मिन्नतवाऱ्या करणाऱ्यांनाही झटका द्यावा लागेल.
.....
गुन्हे शाखेसाठी गर्दी, एसपींचे वेट अँड वॉच
पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेला वेगळे महत्त्व आहे. या शाखेतील ९ पोलीस अंमलदारांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. रिक्त पदांवर नियुक्तीसाठी इच्छुकांची संख्या शेकडोंमध्ये आहे. या शाखेवर डोळा ठेवून अनेकांनी राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप पोलीस अधीक्षकांनी नियुक्त्यांबाबत निर्णय घेतलेला नाही. पोलीस अधीक्षकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
....
पाटोद्याला नवीन ठाणेदार
पाटोदा पोलीस ठाण्याच्या प्रमुखाचे पद पोलीस निरीक्षक दर्जाचे आहे. मात्र, तेथे सहायक निरीक्षक महेश आंधळे हे ठाणेप्रमुख म्हणून कार्यरत होते. जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांची तेथे ८ ऑगस्ट रोजी नेमणूक करण्यात आली. सहायक निरीक्षक आंधळे यांना विनंतीवरून औरंगाबाद येथे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
...
उपअधीक्षकांची तीन पदे रिक्त
जिल्ह्यात उपअधीक्षक दर्जाची तीन पदे रिक्त आहेत. केजचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या निवृत्तीपासून हे पद रिक्त आहे. उपअधीक्षक (गृह) म्हणून पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविलेला आहे. सोबतच आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक पदही रिक्तच आहे. या पदांवर पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अंबाजोगाई येथील उपअधीक्षक सुनील जायभाये वादग्रस्त ठरल्याने ते सध्या सुटीवर आहेत.
....