केंद्रीय पथकाने केली स्वाराती रुग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:22+5:302021-04-10T04:33:22+5:30

अंबाजोगाई : कोविड रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि अलीकडेच वाढलेल्या मृत्यूदराची दखल घेऊन शुक्रवारी केंद्रीय आरोग्य पथकाने स्वाराती ...

Central team inspects Swarati Hospital | केंद्रीय पथकाने केली स्वाराती रुग्णालयाची पाहणी

केंद्रीय पथकाने केली स्वाराती रुग्णालयाची पाहणी

अंबाजोगाई :

कोविड रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि अलीकडेच वाढलेल्या मृत्यूदराची दखल घेऊन शुक्रवारी केंद्रीय आरोग्य पथकाने स्वाराती डीसीसीएचच्या आयसीयु सेंटरला भेट देऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. या पथकात लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्लीच्या डॉ. रक्षदा कुंडल व एआयआयएमएस, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह यांचा समावेश होता.

डीसीसीएचच्या आयसीयु वॉर्डची पाहणी आटोपल्यानंतर केंद्रीय पथकाने कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत उपचार पद्धती समजावून घेतली. अत्यवस्थ कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या आयसीयुमध्ये एसी बसवण्याची सूचना या पथकाने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना केली. बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची पाहणी करुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपणास चार दिवसांत अहवाल पाठवण्यास सांगितले असून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा विस्तृत अहवाल आपण पाठवणार आहोत. या अहवालात मृत्यूदर कमी करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीचा उल्लेख आपण निश्चितपणे करणार आहोत असे या पथकाने सांगितले. या केंद्रीय पथकाच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, कोविडचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, उप अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. राजेश कचरे, डॉ. अभिमन्यू तरकसे, सहा अधीक्षक डॉ. विश्वजित पवार यांच्यासह इतर अधिकारी सोबत होते.

‌डॉक्टर येतात का? योग्य उपचार होतो का?

केंद्रीय आरोग्य पथकातील डॉ. रक्षदा कुंडल आणि डॉ. अरविंद कुशवाह यांनी कोविड सेंटर तसेच स्वारातीच्या डीसीसीएच सेंटरच्या आयसीयु वॉर्डत जाऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची पाहणी केली. यावेळी दोघांनी अनेक रुग्णांशी थेट संवाद साधत आपणास आरोग्य सेवा कशी मिळते याची विचारणा केली. डॉक्टर येतात का? तुमच्या अडचणी समजावून घेतात का? तुमच्यावर योग्य उपचार होतो का? असे प्रश्न यावेळी त्यांनी विचारले.

हेल्थ वर्करच्या परिश्रमापुढे कोरोना टिकणार नाही

कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतांनाच आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत कोविड रुग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करुन या सर्वांच्या परिश्रमापुढे कोविड जास्त काळ टिकू शकणार नाही असा आशावादही या आरोग्य पथकाने व्यक्त केला.

===Photopath===

090421\avinash mudegaonkar_img-20210409-wa0086_14.jpg

Web Title: Central team inspects Swarati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.