गॅसकीटवरील कारने माजलगावजवळ अचानक घेतला पेट; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:29 IST2018-01-29T17:28:15+5:302018-01-29T17:29:37+5:30
बीडकडून परभणीकडे जात असलेल्या कारने माजलगाव-तेलगाव रोडवर अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील हानी टळली.

गॅसकीटवरील कारने माजलगावजवळ अचानक घेतला पेट; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली
माजलगाव (बीड ) : बीडकडून परभणीकडे जात असलेल्या कारने माजलगाव-तेलगाव रोडवर अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील हानी टळली.
आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बीडहून परभणीकडे एक कार निघाली होती. माजलगाव जवळील तेलगाव रोडवर कार आली असता तिच्या खालील बाजूने अचानक पेट घेतला. ही बाब मागून येणाऱ्या बाईकस्वारांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कार चालकाला गाडीने पेट घेतल्याचे सांगितले. यानंतर चालकाने गाडी तत्काळ थांबवत आतील प्रवास्यांना खाली उतरवून सुरक्षित स्थळी पाठवले.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली व त्यांनी आग आटोक्यात आणली. कारला गॅसकीट लावलेली असल्याने आग लवकर आटोक्यात आली नसती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी कारवर चोहुबाजुने पाण्याचा मारा करत त्यातील गॅस सिलेंडर बाजूला काढले. आग आटोक्यात आणण्यात महेंद्रकुमार टाकणखार, सतिश क्षिरसागर, निशिकांत टाकणखार आदी अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले.