पालकमंत्र्यांचे नाव सांगून भाजपा कार्यकर्त्याची दादागिरी
By सोमनाथ खताळ | Updated: May 12, 2023 22:44 IST2023-05-12T22:40:08+5:302023-05-12T22:44:07+5:30
जिल्हा परिषदेच्या सीईओंसोबतच्या वादवाचा व्हिडीओ व्हायरल

पालकमंत्र्यांचे नाव सांगून भाजपा कार्यकर्त्याची दादागिरी
बीड: तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता असे म्हणत वडवणी येथील भाजप कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांच्या अंगरक्षकालाही धक्काबुक्की केली. हा प्रकार गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत घडला होता. याप्रकरणात शहरपोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, या वादाचे सीसीटीव्ही फुटेजचा कथीत व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
धनराज राजाभाऊ मुंडे (रा.वडवणी) असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सीईओ पवार हे वॉर रूममधील शिक्षकांची बैठक घेत होते. याचवेळी धनराज हा आत आला. त्याने तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता, लावू का पालकमंत्र्यांना फोन, तुम्ही पालकमंत्र्यांना बोला, असे म्हणत गोंधळ घातला. त्यानंतर सीईओ पवार यांना शिवीगाळ केली. दालनातील हा आवाज ऐकून अंगरक्षक सचिन साळवे व स्वीय सहायक सचिन सानप हे दालनात आले. त्यांनी धनराजला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने साळवे यांच्याशीही हुज्जत घातली. शिवाय त्यांनाही धक्काबुक्की करत शासकीय गणवेशावरील पोलिस पदक तोडून नुकसान केले. या प्रकारानंतर स्वत: पवार यांनी बीड शहर पोलिसांना फिर्याद दिली. यावरून धनराज मुंडेविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी याचे पडसाद जिल्हाभरात उमटले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत भाजप कार्यकर्त्याला अटक करण्यासह कठोर कारवाईची मागणी केली. या कथीत व्हिडीओतून भाजप कार्यकर्त्याची मुजोरशाही चव्हाट्यावर आली आहे.