ब्रदरला मारहाण; अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:09 IST2019-11-12T00:08:46+5:302019-11-12T00:09:17+5:30
जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती.

ब्रदरला मारहाण; अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल
बीड : जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. उपचारानंतर जखमी ब्रदरने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी चार लोकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
रतन श्रिधर बडे असे मारहाण झालेल्या ब्रदरचे नाव आहे. ९ नोव्हेंबर रोजी शेख आमेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक होत डॉक्टर कोणीच कसे नाहीत, कोठे गेले डॉक्टर असे म्हणत बडे यांच्यासमोरील टेबल उचलून फेकला. तसेच कागपत्रेही फाडून फेकले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अरिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी रूग्णालयात धाव घेऊन तणाव शांत केला होता.
दरम्यान, बडे यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी सुट्टी होताच त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तीन ते चार लोकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि सुरेश खाडे हे करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा रूग्णालयातील मारहाण प्रकरण कॅमेºयात कैद झाले होते. याचे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याची चाचपणी करून आणि ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.