The bride father lied; The relatives number found from the plates! | वधूपिता खोटं बोलला; पत्रावळीवरून शोधले वऱ्हाडी!

वधूपिता खोटं बोलला; पत्रावळीवरून शोधले वऱ्हाडी!

ठळक मुद्देविनापरवानगी विवाहवधूपित्यावर गुन्हा दाखल

बीड : तालुक्यातील सोनपेठवाडीत ८० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत थाटात विवाह पार पडला. येथीलच एक पॉझिटिव्ह निघाला. वधूपिता व आचारी यांना विचारल्यावर केवळ १० लोक उपस्थित होते, असे खोटे सांगितले. नंतर शक्कल लढवून आरोग्य विभागाने जेवलेल्या पत्रावळी मोजल्या आणि त्या दोघांचाही खोटारडेपणा उघड झाला. आरोग्य विभाग आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामात असा उत्तम तपास करीत असल्याने हे शक्य झाले. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात वधूपित्यावर गुन्हा नोंद झाला आहे. 

बीड तालुक्यातील वंजारवाडी येथील एक ३० वर्षीय तरुण १ जुलै रोजी महाड येथून बीडमध्ये आला. चार दिवस हॉटेलमध्ये मित्रांसोबत, तर एक दिवस घरी गेला. क्वारंटाईन राहणे आवश्यक असतानाही ७ जुलै रोजी  सोनपेठवाडी येथे लग्नाला गेला. या लग्नात जवळपास ८० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. परत आल्यावर  त्याचा स्वॅब घेतला आणि ८ जुलै रोजी तो पॉझिटिव्ह आला. आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट,  वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक साळुंके,  डॉ. दत्ता राऊत, ग्रामसेवक अनंत शिंदे  हे रात्री १ वाजता  विवाहस्थळी पोहोचले. वधूपिता, आचारी व भटजी यांना विचारणा केली असता त्यांनी केवळ दोन्ही बाजूंचे १० लोक होते, असे सांगितले. पथकाने  जेवणाच्या पत्रावळी मोजल्या. त्या ८० पेक्षा जास्त दिसल्याने पुन्हा विचारणा केली. यावर त्यांनी जास्त लोक होते, अशी कबुली दिली. 

 

Web Title: The bride father lied; The relatives number found from the plates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.