बीडमध्ये मास्कचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:21 IST2020-03-12T23:20:56+5:302020-03-12T23:21:26+5:30
कोरोना’ आजाराच्या भितीने काळजीपोटी सर्वच लोक आता मास्कचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच खाजगी दुकानांवर तर मास्कचे दरही वाढले आहेत.

बीडमध्ये मास्कचा तुटवडा
बीड : ‘कोरोना’ आजाराच्या भितीने काळजीपोटी सर्वच लोक आता मास्कचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच खाजगी दुकानांवर तर मास्कचे दरही वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयातही मास्कचा तुटवडा जाणवत असून कापडी मास्क शिवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरूवारी तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही वापरण्यास मास्क उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
सध्या जगभर कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह आवाहन केले जात आहे. हात स्वच्छ धुणे, हस्तांदोलन टाळणे, मास्क वापरणे, बाधित रुग्णांशी संपर्क टाळणे अशा गोष्टींवर माहिती दिली जात आहे. याच अनुषंगाने आता अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही मास्कचा वापर करताना दिसत आहेत. याचाच फायदा खाजगी दुकानदारांना होत आहे.
एन ९५ मास्कच्या किंमती २०० ते ५०० रुपयांपर्यंत गेली असून साध्या मास्कची किंमती ३० रुपयांपर्यंत पोहचली आहे.
असे असले तरी भिती आणि काळजीपोटी नागरिक मास्कची खरेदी करताना दिसत आहेत.
कंत्राटदाराकडूनही माघार
बीडच्या आरोग्य विभागाला मास्क पुरवठा करणाºया कंत्राटदारानेही मास्कचा तुटवडा असल्याने माघार घेतली आहे. कच्चा माल नसल्याने मास्क बनविण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसे पत्रही जिल्हा रुग्णालयाला दिल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यभर सर्वत्रच हा तुटवडा जाणवत असल्याने मास्क आणायचे कोठून? असा प्रश्न आरोग्य विभागासमोर आहे.