आडस : येथील महिलांनी मतदान करून बाटली आडवी केली होती. मात्र नऊ वर्षानंतर दारूची दुकाने पुन्हा सुरू झाल्याने महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गावात दारूबंदीसाठी २००८ पासून आंदोलन करण्यात आले होते. २०११ साली मतदान करून दोन बिअर बार, एक देशी दारूचे दुकान आणि तीन बिअरशाॅपी असे ६ दुकानांचे परवाने रद्द झाले होते. आता ही दुकाने सुरू झाली आहेत. अवैध दारू सुरूच होती मात्र आता परवानगी देऊन ही दुकाने सुरू झाल्याने महिलांमध्ये नाराजी उमटली आहे. याबाबत ग्रामपंचायतने आम्हाला अंधारात ठेवले आहे. असा कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. त्यावर महिलांच्या स्वाक्षऱ्या नाहीत, किंबहुना त्यांना माहिती दिली नाही. आडसची बाटली उभी राहिली हीच खेदाची बाब आहे. महिलांना एकत्र करून आंदोलन करणार असल्याचे सविता आकुसकर यांनी लोकमतला सांगितले. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी अशोक तोडकर यांना संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता.