हलाखीच्या परिस्थितीने त्या दोघी देहविक्रीच्या दलदलीत - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST2021-08-13T04:37:30+5:302021-08-13T04:37:30+5:30
बीड : घरची परिस्थिती नाजूक... हाताला काम नसल्याने खाण्या-पिण्याचे वांधे... या बिकट परिस्थितीने दोन पीडितांना देहविक्रीच्या दलदलीत लोटले. ९ ...

हलाखीच्या परिस्थितीने त्या दोघी देहविक्रीच्या दलदलीत - A
बीड : घरची परिस्थिती नाजूक... हाताला काम नसल्याने खाण्या-पिण्याचे वांधे... या बिकट परिस्थितीने दोन पीडितांना देहविक्रीच्या दलदलीत लोटले. ९ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) यांनी संयुक्त कारवाई करून, शिवाजीनगर ठाणे हद्दीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.
यातीन दोन पीडितांची आपबिती ऐकून पोलिसांना दारिद्र्याचे चटके किती भीषण आहेत, याचा प्रत्यय आला. शहरातील पालवण चौकातील नाथनगरात शकुंतला सुरेश राऊत (४५) हिला कुंटणखाना चालविताना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व एएचटीयूचे उपनिरीक्षक शिवाजी भारती यांनी दोन डमी ग्राहकांना पाठवून ही कारवाई केली. यावेळी दोन पीडितांकडून शकुंतला राऊत ही वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
दोन वर्षांपासून ती घरातच कुंटणखाना चालवायची. ग्राहकांना फोनवर संपर्क करून व्यवहार ठरायचा. दरम्यान, यातील ३२ वर्षीय पीडिता ही विवाहित आहे, तर २२ वर्षांची पीडित अविवाहित आहे. दोघींच्याही गरिबी व परिस्थितीचा फायदा घेत, शकुंतलाने त्यांना पैसे कमावण्यासाठी या धंद्यात आणले. आंटी ग्राहकांकडून एक हजार रुपये घ्यायची. त्यातील पाचशे रुपये आंटी स्वत:ला ठेवायची, तर उर्वरित पाचशे रुपये पीडितेला मिळायचे. अवघ्या पाचशे रुपयांसाठी त्यांना देहविक्री करावी लागत होती, असे चौकशीत समोर आले.
... आंटीची रवानगी पोलीस कोठडीत आंटी शकुंतला राऊत व दोन पीडितांना १० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आंटीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर दोन पीडितांना महिला सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.
....