धाडसी दरोडा; वृद्धेची हत्या करून सव्वासात लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:01 IST2019-04-01T23:59:34+5:302019-04-02T00:01:52+5:30
शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला.

धाडसी दरोडा; वृद्धेची हत्या करून सव्वासात लाखांचा ऐवज लंपास
गेवराई : शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला. तसेच ६१ वर्षीय वृद्ध महिलेचा मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून व वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
पुष्पाबाई शिवकुमार शर्मा असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त सेवक होत्या. नेहमीप्रमाणे त्या घरातील माडी खालील खोलीत झोपी गेल्या. माडीवरील खोलीत दोन्ही मुले आपल्या कुटुंबांसमवेत झोपली होती. तर लहान मुलगा पंकज हा बाहेर गावी गेला होता.
सोमवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले नगदी ५ लाख रुपये तसेच पुष्पाबार्इंच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, कानातील झुंबर, साखळी तसेच कपाटात ठेवलेल्या अंगठ्या, गळयातील गंठण असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजव लंपास केला. हा ऐवज लुटताना पुष्पाबाई शर्मा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला झाला. तसेच मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून खून केला. त्यानंतर मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
सकाळी ६ वाजले तरी आई उठली का नाही, हे पाहण्यासाठी प्रवीण खाली आले. यावेळी त्यांना आई मृतावस्थेत पडलेली व कपाटातील सामान विखुरलेले आढळले. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात प्रवीण शर्मा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे हे करीत आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण
दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस असे चार पथके तयार केली आहेत. घटनेनंतर ते तात्काळ तपासासाठी रवाना झाल्याचे पोनि बडे यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
घाडगे दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाने खळबळ
२३ आॅगस्ट २०१७ रोजी शहरातील गणेशनगर भागातील आदिनाथ घाडगे व अलका घाडगे या दाम्पत्यावर हल्ला करून त्यांची हत्या दरोडेखोरांनी केली होती. तसेच एका मुलीला गंभीर जखमी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. सहा महिन्यानंतर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचाही मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती.