पोलीस नियंत्रण कक्षाला ब्लँक कॉल, पोलीस यंत्रणा नाहकच कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:35+5:302021-08-12T04:37:35+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षातून कायदा-सुव्यवस्था हाताळली जाते. पोलिसांच्या तातडीच्या मदतीसाठी आतापर्यंत १०० हा क्रमांक आहे. मात्र, यावर येणाऱ्या ...

पोलीस नियंत्रण कक्षाला ब्लँक कॉल, पोलीस यंत्रणा नाहकच कामाला
पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षातून कायदा-सुव्यवस्था हाताळली जाते. पोलिसांच्या तातडीच्या मदतीसाठी आतापर्यंत १०० हा क्रमांक आहे. मात्र, यावर येणाऱ्या ब्लँक कॉल्सनी पोलिसांना नाहकच कामाला लागावे लागत आहे. यात व्यर्थ वेळ तर जातोच; पण डोकेदुखीही वाढते. दरम्यान, आता १०० हा हेल्पलाइन क्रमांक बंद होणार असून ११२ क्रमांकावर संपर्क केल्यावर पोलिसांची मदत मिळणार आहे. ११२ हेल्पलाइन १५ ऑगस्टपासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अंमलदारांना प्रशिक्षणदेखील दिले आहे.
कॉलची होत नाही नोंद
पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आलेल्या एकूण कॉलची नोंद होत नाही. मात्र, कायदा-सुव्यवस्थेसंबंधी येणाऱ्या कॉलची माहिती व या कॉलला दिलेल्या प्रतिसादाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते.
...
१०९१ हेल्पलाइनवरही येतात कॉल
महिलांसाठी १०९१ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहे. अडचणीत असलेल्या महिलांनी यावर कॉल केल्यावर त्यांना तातडीने मदत करण्यात येते. संबंधित ठाण्यांना कळवून तातडीने पोलिसांना रवाना केले जाते. १०९१ या क्रमांकावर अधिकाधिक महिला कॉल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
....
दररोज किमान दहा ब्लँक कॉल
पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर दररोज किमान दहा ब्लँक कॉल येतात, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. काही जण मोबाइलवरून कॉल जातो की नाही हे तपासण्यासाठी १०० क्रमांक डायल करतात. काही जण कॉल करतात अन् काहीच बोलत नाहीत. इकडे हॅलो, हॅलो करून नियंत्रण कक्षातील अंमलदार वैतागून जातात. मोबाइलमधील बॅलन्स संपल्याने इमर्जन्सी कॉल जातो किंवा नाही यासाठी सुद्धा काही लोक कॉल करतात. वेगवेगळ्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती मागविण्यासाठी देखील १०० क्रमांक डायल करणारे महाभाग आहेत.
....
बीडमध्ये १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनवर निव्वळ अफवा पसरविणारे किंवा फेक कॉल येतात असे नाही. मात्र, ब्लँक कॉलची संख्या अधिक आहे. अनेक जण कॉल करतात; पण बोलत काहीच नाहीत. काही जण कायदा- सुव्यवस्थेसंदर्भातही माहिती देतात. त्यानुसार संबंधित ठाण्यांना कळवून परिस्थिती हाताळणे सोपे बनते.
-शार्दुल सपकाळ, सहायक निरीक्षक, नियंत्रण कक्ष, बीड
...