NCP Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित असतील अशी माहिती काल पक्षाकडून देण्यात आली होती. मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे मी मुंबईला जात असून या दौऱ्यात हजर राहू शकणार नाही, असा खुलासा मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, माझ्या अनुपस्थितीबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशी माझी विनंती असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीकडून मुंडेंबाबत काय सांगण्यात आलं होतं?
अजित पवार यांचा बीड दौरा निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी या दौऱ्यात धनंजय मुंडे उपस्थित असतील असं सांगितलं होतं. "गुढीपाडव्यानिमित्त परळीतील विविध दुकाने आणि रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हे हजर राहिले होते. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही विविध कार्यक्रमांत उपस्थित असतील आणि यापुढे पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी सक्रिय होतील," असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला होता.