Walmik karad Beed: पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मागील १५ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने आज झालेल्या सुनावणीनंतर खंडणी प्रकरणात वाल्मीकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मीक कराडला जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र सरपंच हत्येच्या गुन्ह्यातही कराडचा सहभाग असल्याने त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत एसआयटीने त्याचा ताबा मागितला. तसंच मोक्का कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयीन कोठडीत गेलेल्या वाल्मीक कराडचा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एसआयटीकडून तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. तसंच उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी कराडला पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती एसआयटीकडून कोर्टाकडे केली जाणार आहे. त्यामुळे आज खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मीकला उद्या मोक्का कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडवर कारवाईचा फास आवळला जाऊ लागताच त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.