बीडच्या अविनाश साबळेचा पराक्रम; आशियाई ॲथलेटिक्समध्ये ३००० मी. स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:53 IST2025-05-30T16:52:59+5:302025-05-30T16:53:20+5:30
३६ वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक; जपान व कतारच्या धावपटूंना मागे टाकत अविनाश साबळेची मुसंडी

बीडच्या अविनाश साबळेचा पराक्रम; आशियाई ॲथलेटिक्समध्ये ३००० मी. स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
बीड/ गुमी (दक्षिण कोरिया) : राष्ट्रीय विक्रमवीर बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने गुरुवारी येथे हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेच्या ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर ३६ वर्षांत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.
साबळेने ८ मिनिटे २०.९२ सेकंद असा वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. अविनाशचे हे आशियाई स्पर्धेतील दुसरे पदक आहे. याआधी त्याने २०१९ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. भारताकडून याआधी दीनाराम याने १९८९ मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. हरबेलसिंग हे स्टीपल चेसमध्ये सुवर्ण जिंकणारे भारताचे पहिले पुरुष खेळाडू होते. त्यांनी हे सुवर्ण १९७५ मध्ये जिंकले होते. जपानच्या युतारो नीनाए याने ८ मि. २४.४१ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. तो अखेरच्या लॅपच्या सुरुवातीला आघाडीवर होता; परंतु भारतीय खेळाडू अविनाशने जोरदार मुसंडी मारत सुवर्णपदक जिंकले. कतारचा जकरिया इलाहलामी याने ८ मि. २७.१२ सेकंदांसह कास्यपदक जिंकले.
याआधी रिंस जोसेफ, धर्मवीर चौधरी, मनू थेक्किनालील साजी आणि मोहित कुमार या भारताच्या ४ बाय ४०० मीटर पुरुष रिले संघाने अंतिम फेरीत धडक मारली. भारताच्या या चौकडीने ३ मि. ६.२८ सेकंद अशी आतापर्यंतची सर्वोत्तम वेळ नोंदवताना आपल्या हीटमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. हीटमध्ये भारताने चीन (३ मि. ६.७९ सेकंद) आणि यजमान कोरिया (३ मि. १०.५ सेकंद) यांना मागे टाकत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. श्रीलंकेने या हंगामातील ३ मि. १.५६ सेकंद ही त्यांची वेगवान वेळ नोंदवली.
महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भारताच्या संजीवनी जाधव हिने ३३ मि. ८.१७ सेकंद हा आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना पाचवे स्थान मिळवले, तर सीमा सहाव्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत कजाखिस्तानची डेजी जेपकेमीने सुवर्ण, जपानच्या रिरिक हिरोनिका आणि मिकुनी याडा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.