भावकीतील वादातून थरार; मोठ्या भावाने शेतीच्या वादातून ३ सख्ख्या भावांना संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:13 PM2019-07-29T14:13:22+5:302019-07-29T14:19:00+5:30

मोठ्या भावासह तिघे ताब्यात;पूर्वनियोजित कट असल्याचा संशय

Beed Thrilled by the controversy in the brothers; Elder brother killed 3 younger brothers from the agricultural land dispute | भावकीतील वादातून थरार; मोठ्या भावाने शेतीच्या वादातून ३ सख्ख्या भावांना संपवले

भावकीतील वादातून थरार; मोठ्या भावाने शेतीच्या वादातून ३ सख्ख्या भावांना संपवले

googlenewsNext
ठळक मुद्दे मोठ्या भावाने व दोन पुतण्यांनी इतर पाच ते सहा जणांच्या साह्याने केला खून तिघा भावांची परिस्थिती बेताचीचकर्तव्यात कसूर; महिला उपनिरीक्षक, जमादार निलंबित

बीड : शहरातील माळी गल्लीतील रहिवासी तीन सख्ख्या भावांचा त्यांच्याच मोठ्या भावाने व दोन पुतण्यांनी इतर पाच ते सहा जणांच्या साह्याने शेतीच्या वादातून खून केल्याची घटना शनिवारी (दि. २७ ) सकाळी अकराच्या सुमारास घडली. किरण काशीनाथ पवणे, प्रकाश काशीनाथ पवणे, दिलीप काशीनाथ पवणे, अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात किसन पवणे आणि त्याची दोन मुले अ‍ॅड. कल्पेश आणि डॉ. सचिन अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किरण, प्रकाश आणि दिलीप, तसेच किसन पवणे हे चार भाऊ आहेत. ते लहान असताना पिंपरगव्हाण परिसरात १२ एकर शेती किसन यांनी आईच्या पेन्शनमधून खरेदी केली होती. किसन पवणे हे महावितरणमध्ये नोकरीला होते, तसेच सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी सदरील शेती त्यांच्या नावे करून घेतली होती. एकत्र कुटुंब असताना शेती खरेदी केलेली असल्याने त्याच्यात वाटा मिळावा, अशी मागणी इतर तीन भावांनी केली होती. याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाच्या परवानगीने काही शेती किसन यांनी विकल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शनिवारी सकाळच्या सुमारास पिंपरगव्हाण परिसरात असलेल्या १२ एकर शेतीमध्ये किसन काशीनाथ पवणे हे प्लॉटिंगसाठी सफाई करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर किरण, प्रकाश, दिलीप आणि दिलीप यांचा मुलगा हे त्यांना अडविण्यासाठी तेथे गेले होते. शेती वादाचा निकाल लागल्यानंतरच शेतीसंदर्भातील निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली होती. याच दरम्यान त्यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी किसन यांचा मुलगा अ‍ॅड.कल्पेश पवणे व डॉ.सचिन पवणे हे इतर पाच ते सहा जणांसह तेथे आले. या सर्वांनी मिळून किरण, प्रकाश, दिलीप आणि दिलीप यांचा मुलगा यांच्यावर हल्ला केला. यामध्ये किरण, प्रकाश व दिलीप यांच्यावर तलवार, गज व कुºहाडीने वार करुन त्यांची निर्घृणपणे हत्या केली. दिलीप यांच्या मुलाने पळ काढला व घरी येऊन सर्व हकीकत सांगितली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.

स्वत:च पोलिसांना केला फोन
कल्पेशने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती कळवली. यामध्ये आपण देखील जखमी झाल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला झालेल्या तिघांपैकी जखमी असलेल्या किरण पवने यांना रुग्णालयात पाठविण्याची सोय केली. मात्र, रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डॉ. सचिन आणि अ‍ॅड. कल्पेश यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन हा बीएएमएस डॉक्टर आहे. किसन हा फरार झाला होता, त्यास रात्री ताब्यात घेतले. 

वादातील जमीन पडीक
पिंपरगव्हाण परिसरात १२ एकर शेती आहे. न्यायालयात वाद सुरु असल्यामुळे सर्व जमीन पडीक आहे. ही सर्व शेती मी खरेदी केल्याचे वारंवार किसन हे इतर भावांना सांगत असत. परंतु यापैकी ६ एकर शेतीचे हिस्से करुन दीड एकर शेती देण्याची मागणी इतर तिघे बंधू करीत होते.

पूर्वनियोजित कट असल्याचा संशय
कल्पेश किसन पवणे, सचिन किसन पवणे व किसन पवणे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु स्व-रक्षणासाठी तलवार व इतर धारदार हत्यारे वापरल्यामुळे पोलिसाकडून या हत्यारांचा शोध सुरु आहे. शेतातील विहिरीत हत्यारे टाकल्याचा संशय असल्यामुळे विहिरीतील पाणी काढण्याचे काम सुरु आहे.

तिघा भावांची परिस्थिती बेताचीच
किरण, प्रकाश, दिलीप हे तिघे माळी गल्लीतील एका वाड्यात राहतात. प्रकाश यांचे चहाचे हॉटेल होते. दिलीप हे वॉचमन म्हणून काम पाहतात, तर किरण एका दुकानात कामाला होते.तिघांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी जमिनीत वाटा मिळावा, अशी मागणी केली होती.

कर्तव्यात कसूर; महिला उपनिरीक्षक, जमादार निलंबित
तिहेरी खून प्रकरणातील आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे याने शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या जिवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिसांत दिला होता. त्यावरून ठाणे अंमलदार असलेल्या वंजारे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. परंतु कर्तव्यावर असलेल्या मपोउपनि. जोगदंड यांनी गैरअर्जदाराविरोधात तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी तात्काळ कारवाई न करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोघांना निलंबित केले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासात खुद्द पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे.मपोउपनि मनीषा जोगदंड, पोहेकॉ.राजेभाऊ वंजारे अशी निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

कल्पेशला ७ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, किसन हा फरार असल्यामुळे त्याला दुपारी अटक करण्यात आली होती तर सचिन व कल्पेश हे स्वत:हून शरण आले होते. उपचारानंतर कल्पेश याला पोलिसांनी ठाण्यात नेले, तर किसन व सचिन हे रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करता आले नाही. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी कल्पेश पवनेला रविवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कदीर अहमद सरवरी यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी सावंत यांनी आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शहाजी जगताप यांनी दहा दिवसांच्या कोठडीला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने कल्पेशला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हत्यारे सापडली !
तिहेरी हत्याकांडाचा तपास उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे व त्यांचे पथक करीत आहे. हत्याकांडानंतर आरोपींनी हत्यारे शेताजवळील विहिरीत टाकल्याचा संशय पोलिसांना आला होता. रविवारी दिवसभर विहिरीतील पाणी उपसण्यात आले. यावेळी एक कुकरी व दोन लोखंडी गज मिळून आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Beed Thrilled by the controversy in the brothers; Elder brother killed 3 younger brothers from the agricultural land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.