बीड हादरले ! केमिकल कॅनच्या भीषण स्फोटात एक जण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 13:04 IST2020-12-18T12:42:11+5:302020-12-18T13:04:41+5:30
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जिजामाता चौकातील एका दुकानातील घटना

बीड हादरले ! केमिकल कॅनच्या भीषण स्फोटात एक जण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी
बीड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जिजामाता चौकातील एका दुकानात केमिकल कॅनचा भीषण स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी ( दि. १८ ) सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडली. अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ असे मृताचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी पोहंचले असून तपासणी सुरू आहे.
अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ, (वय ३२, रा. सेलू, ता. गेवराई) शहरातील मोंढा रोडवर चंपावती हार्डवेअर हे एक दुकान आहे. त्यांचे मसरतनगर भागात गोदाम होते. या गोदामात हा स्फोट झाला. सामान घेण्यासाठी या गोदामात एक ट्रॉली आली होती. काही सामान भरले होते. केमिकलची कॅन उघडून पाहत असताना हा भीषण स्फोट झाला. यावेळी दुकानात तिघे जण उपस्थित होते. स्फोटाच्या हादऱ्याने अनिरुद्ध पांचाळ हा दुकानाबाहेर फेकल्या गेला यातच त्यांचा मृत्यू झाला. कॅनचे तुकडे तुकडे होऊन लांबवर विखुरल्या गेले. कॅनमधील केमिकल हे खूप जुने होते. जास्त जुने केमिकल ठेवल्यामुळे आणि झाकण उघडताच हा स्फोट झाला. इतर दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.