बीडमध्ये चोरीच्या ११ दुचाकींसह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:36 IST2018-01-05T19:35:44+5:302018-01-05T19:36:38+5:30
शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

बीडमध्ये चोरीच्या ११ दुचाकींसह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड : शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आणखीही काही दुचाकी सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विकासचे आई-वडील मजुरी करतात तर अवघे १५ वर्षे वय असलेल्या अल्पवयीन आरोपीला आई-वडील नाहीत. दोघेही एकाच गावातील असल्याने त्यांची चांगलीच मैत्री होती. मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने त्यांनी दुचाकी चोरी करण्याचा व्यवसाय निवडला. मागील दीड महिन्यापासून त्यांनी बीड शहरातून तब्बल ११ दुचाकी चोरल्या. या सर्व दुचाकी त्यांनी कोळगावला विकासच्या घरात ठेवल्या. विकासच्या मोठ्या भावाची कोळगाव रोडला टपरी आहे. त्यामुळे तो घरी येत नसे. आई-वडीलही वेगळ्या घरात राहत असल्याने त्यांची घरात लक्ष नव्हते. याचाच फायदा घेऊन त्यांनी घरात दुचाकी लपवल्या. एकवेळेस भावाने विचारले, तर यांनी बीडमध्ये आपल्या ओळखीचे लोक असून त्यांच्या गोडाऊनमध्ये जागा नसल्याने गावाकडे दुचाकी आणल्याचे सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गुरूवारी यातील अल्पवयीन आरोपी हा बीडमध्ये भाजीमंडई भागात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पोलीस कर्मचारी उबाळे यांना दिसला. त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना माहिती दिली. त्याप्रमाणे सापळा लावला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि रवी सानप, दिलीप तेजनकर, सचिन पुंडगे, मोहन क्षिरसागर, श्रीमंत उबाळे, रवी उबाळे, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, शेख नसीर, सतिष कातखडे, सखराम सारूक, परमेश्वर सानप, चालक राठोड आदींनी केली.
दोघेही नवीन गुन्हेगार
मागील काही दिवसांपासून नव्या गुन्हेगारांच्या टोळ्या बनू लागल्या आहेत. त्यामुळे तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे नवीन आहेत. तसेच यापूर्वी गेवराईत लुटमार करणारे आरोपीही नवीनच होते, असे तपासातून समोर आले होते.