परळी ( बीड): येथील रेल्वे स्थानक परिसरात रविवारी मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसाठी ३ सप्टेंबर रोजी परळीतील सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि व्यापाऱ्यांनी निषेध मूक मोर्चा काढला.
सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून सुरू झालेला मूक मोर्चा मेन रोड, मोंढा मार्केट, स्टेशन रोड, एक मिनार चौक मार्गे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, "आरोपीला फाशी झालीच पाहिजे!" "पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे!" "रेल्वे पोलीस प्रशासन हाय हाय!" असा आवाज बुलंद केला. मोर्चेकरांच्या वतीने नायब तहसीलदार परविन पठाण आणि रेल्वे स्टेशन अधीक्षक मीना यांना निवेदन देण्यात आले.
रविवारी दुपारी पंढरपूरहून मजुरीच्या शोधात परळीला आलेल्या कुटुंबातील चिमुरडीवर एका नराधमाने रेल्वे स्थानक परिसरात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना समजताच बीड एलसीबी आणि परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी वेगवान कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली.या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेले.
शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व व्यापारी वर्गाने या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत कडक शासनस्तरीय कारवाई आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मोर्चा आणि रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, परळी शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, रेल्वे पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.