Beed Parishad Election Result 2025: बीडमध्ये क्षीरसागर बंधूंना धक्का; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:25 IST2025-12-21T17:24:46+5:302025-12-21T17:25:07+5:30
या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला.

Beed Parishad Election Result 2025: बीडमध्ये क्षीरसागर बंधूंना धक्का; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी
बीड: बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय चमत्कार पाहायला मिळाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर असलेली क्षीरसागर घराण्याची एकहाती सत्ता बीडच्या मतदारांनी दूर सारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार प्रेमलता पारवे यांनी ३,७७९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर नाव कोरले. क्षीरसागर घराण्याने ठरवलेल्या उमेदवारा व्यतिरिक्त नगराध्यक्ष झाल्याने ऐनवेळी भाजपत गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे ( शप) आमदार संदीप क्षीरसागर या दोन्ही बंधूंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला. दहाव्या फेरीपर्यंत भाजपच्या डॉ. ज्योती घुम्रे यांनी आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या टप्प्यात प्रेमलता पारवे यांनी मुसंडी मारली. पारवे यांना ३५,८१२ मते मिळाली, तर डॉ. ज्योती घुम्रे ३५,०३३ मतांवर अडकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या स्मिता वाघमारे यांना २५,४४० मतांवर समाधान मानावे लागले.
क्षीरसागर बंधूंना दणका
डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांची नगरपालिकेतील मक्तेदारी संपवण्यासाठी बीडकरांनी यावेळी परिवर्तनाचा पवित्रा घेतला होता. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 'संजीवनी' मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. दुसरीकडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी पूर्ण ताकद लावूनही त्यांची यंत्रणा कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अमरसिंह पंडितांचा 'बीड' पॅटर्न यशस्वी
माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराईत आपला गड गमावला असला तरी, बीडमध्ये मात्र त्यांनी विजयाची गणिते अचूक जुळवली. प्रेमलता पारवे यांच्या पाठीशी आपली संपूर्ण यंत्रणा उभी करून त्यांनी क्षीरसागरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला.
नगरसेवक पदाचे पक्षनिहाय बलाबल (एकूण ५० जागा):
राष्ट्रवादी (अजित पवार गट): १८
भाजप: १४
राष्ट्रवादी (शरद पवार गट): ११
शिवसेना (शिंदे गट): ०३
शिवसेना (ठाकरे गट): ०१
एमआयएम: ०२
काँग्रेस: ०१