बीड : वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे बीड नगरपरिषदेने पाणी पुरवठ्याच्या वीजबिलाचे २ कोटी १४ लाख रुपयांचा भरणा केला आहे, तसेच माजलगाव नगरपालिकेनेही दिवाबत्ती व पाणीपुरवठ्याचे ८० लाख रुपये भरले आहेत.
वीजबिलाच्या थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला होता. पाणी पुरवठ्याच्या वीजबिलासाठी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड मंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, व्यवस्थापक प्रदीप वाघमोडे, तंत्रज्ञ विकास शिंदे, तंत्रज्ञ निर्मळ यांनी बीड नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या वीजबिलाची थकबाकी भरून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी सहकार्य केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
असा केला भरणा
त्यामुळे एप्रिल २०२० ते २०२१ बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काडीवडगाव पाणीपुरवठा वीज जोडणीचे नगरपालिकेकडून १ कोटी ९ लाख ४ हजार १६६ रुपये व पिंपळगाव मांजरा पाणीपुरवठा वीज जोडणीचे १ कोटी ५ लाख ६८ हजार ७२७ रुपये असे एकूण सुमारे २ कोटी १४ लाख रुपये महावितरणकडे भरणा करण्यात आला आहे.