Beed: मुलीवर बलात्कार; केस मिटविण्यासाठी पैशांचे आमिष, नकार देताच वडिलांचे अपहरण
By सोमनाथ खताळ | Updated: December 13, 2025 16:15 IST2025-12-13T16:07:11+5:302025-12-13T16:15:06+5:30
बीडमधील प्रकार; पीडित मुलीच्या आईची न्यायासाठी विधि सेवा प्राधिकरणकडे धाव

Beed: मुलीवर बलात्कार; केस मिटविण्यासाठी पैशांचे आमिष, नकार देताच वडिलांचे अपहरण
बीड : सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडितेच्या पालकांवर आरोपीच्या नातेवाइकांनी दबाव आणला. त्यांनी केस मिटविण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले; मात्र, वडिलांनी नकार दिल्यावर त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायासाठी पीडितेच्या आईने विधि सेवा प्राधिकरणकडे धाव घेऊन सचिवांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत काही राजकीय नेत्यांच्या नावांचाही उल्लेख असल्याने वातावरण तापले आहे.
५ नोव्हेंबर रोजी एका ११ वर्षांच्या मुलीवर सूरज खांडे (रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याने अत्याचार केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, खांडे याला अटक झाली आहे. मुलीला असुरक्षित वाटू लागल्याने पालकांनी तिचे शिक्षण बंद केले होते. शुक्रवारी विधि व सेवा प्राधिकरण आणि बालकल्याण समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पीडितेने समितीची भेट घेतली, जिथे तिने आणखी काही धक्कादायक माहिती दिली. यावर प्राधिकरणचे सचिव सय्यद वहाब यांनी पोलिसांना तातडीने व कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
सकाळी १० वाजल्यापासून वडील बेपत्ता
गुरुवारी रात्री ८ वाजता पीडितेच्या वडिलांना सूरज खांडेच्या नातेवाइकांचा फोन आला. केस मिटवून घेण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखवले; पण, त्यांनी नकार दिल्यावर मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेचे वडील गुरुवारची रात्र मेहुण्याकडे थांबले. मात्र, शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून ते बेपत्ता झाले. वडिलांचे अपहरण झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने विधि सेवा प्राधिकरणकडे दिली, त्यावरून सचिवांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधून कारवाईचे निर्देश दिले. बालहक्क कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनीही यात पीडित कुटूंबाला आधार दिला.
बालकल्याण समितीच्या पत्रानंतर हालचाल
पीडितेला २४ तासांत बालकल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक होते; परंतु, पोलिसांनी ‘बंधनकारक नसल्याचे’ सांगत हजर केले नाही. गुरुवारी समितीने पत्र दिल्यावर शुक्रवारी पोलिसांना जाग आली आणि त्यांनी हजर करण्याची कार्यवाही सुरू केली. तरीही दुपारी ५ वाजेपर्यंत पीडितेला हजर केले नव्हते, असे समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी सांगितले.
तक्रार दिली नव्हती
बालकल्याण समितीच्या पत्रानुसार आम्ही हजर करीत आहोत. मला विधि सेवा प्राधिकरण विभागाकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. पीडितेच्या आईने पती बेपत्ता असल्याची माहिती दिली; परंतु, तक्रार दिली नव्हती. त्या लगेच निघून गेल्या.
- पूजा पवार, उपअधीक्षक, बीड
पोलिसांना निर्देश दिले आहेत
पीडितेची आई आमच्याकडे आली होती. त्यांनी पतीचे अपहरण झाल्याचे सांगितले तसेच काळजी करत संरक्षणाची मागणी केली. त्यानुसार आम्ही पोलिसांना निर्देश दिले आहेत. तसेच त्यांना संरक्षण देण्याचीही तरतूद करीत आहोत.
- सय्यद वहाब, सचिव, विधि व सेवा प्राधिकरण, बीड
समुपदेशन करून सर्वांनी आधार दिला
पीडिता शुक्रवारी दुपारी ५ वाजेपर्यंत आमच्यापुढे हजर केली नव्हती, परंतु त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत. पीडितेची आई आल्यानंतर समुपदेशन करून सर्वांनी आधार दिला आहे.
- संतोष वारे, सदस्य, बालकल्याण समिती, बीड