बीड : म्हाडा परीक्षा; तोतयागिरीचा ‘तो’ मास्टरमाइंड कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:20 IST2022-02-21T12:20:18+5:302022-02-21T12:20:59+5:30
म्हाडा परीक्षेत तोतयागिरी करताना रंगेहाथ पकडलेला अर्जुन बाबूलाल बिघोत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बीड : म्हाडा परीक्षा; तोतयागिरीचा ‘तो’ मास्टरमाइंड कोण?
बीड : म्हाडा परीक्षेत तोतयागिरी करताना रंगेहाथ पकडलेला अर्जुन बाबूलाल बिघोत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राहुल सानपच्या जागी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी आलेल्या अर्जुन बिघोतला उत्तरे कोण सांगणार होते, या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण, याचे गूढ कायम आहे.
म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाच्या नोकरभरतीसाठी १ फेब्रुवारीला परीक्षा हाेती. बीडमध्ये खासगी संगणक केंद्रावर राहुल किसन सानप (रा. वडझरी, ता. पाटोदा) याच्या जागी अर्जुन बाबूलाल बिघोत (रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा परीक्षा देण्यासाठी आला होता. केंद्रात प्रवेश देताना आधारकार्ड वेगळेच दिल्याने त्याचा भांडाफोड झाला होता. याप्रकरणी बिघाेतसह सानपवर गुन्हा नोंद करण्यात आला. बिघोत सध्या जिल्हा कारागृहात आहे, तर सानप यास अंतरिम जामीन मिळालेला आहे.
बिघोतने जामिनावर बाहेर येण्यासाठी, तर सानपने जामीन कायम व्हावा, यासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्याची सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. तथापि, नागपूर येथे म्हाडा परीक्षेत ताेतया परीक्षार्थीला बसविणाऱ्या बीडच्या अभिषेक सावंत यास अटक झाली आहे. यावरून अनेकजण जाळ्यात अडकल्याचा संशय आहे. बिघोतकडे मायक्रो यंत्र व डिव्हाईस आढळून आले आहे. त्यामुळे त्यास कोणी तरी उत्तरे सांगणार होते हे निश्चित आहे. सूत्रधारांच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.