बीड जिल्हा परिषदेच्या सुनावणीमध्ये २४ शिक्षक ठरले दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:48 IST2018-07-21T00:47:35+5:302018-07-21T00:48:32+5:30
जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्हा परिषदेच्या सुनावणीमध्ये २४ शिक्षक ठरले दोषी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्हा परिषदेतील ३४७१ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना चुकीची व खोटी माहिती देत अनेक शिक्षकांनी बदलीचा फायदा घेतला होता. त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले होते. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. आलेल्या ४१५ तक्रारीनुसार गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र काही शिक्षकांनी अर्जाद्वारे स्वतंत्र तक्रारी केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तक्रारींची संख्या ३७३ एवढी असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३७३ शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यामध्ये पती-पत्नीमधील अंतर कमी दाखविणे, नियुक्ती दिनांक चुकीचा दाखविणे, प्राथमिक पदवीधर विषय चुकीचा दाखविणे असे प्रकार आढळून आले. यात दोषी आढळलेल्या २४ पैकी १२ शिक्षकांवर यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सेवाकनिष्ठाला पदस्थापना, कनिष्ठांकडून खो, पसंतिक्रमातील पद रिक्त असणे आदी प्रकारच्या ३५ तांत्रिक त्रुटी असणाऱ्या तक्रारी शासनाला कळविण्यात येणार आहेत.४९ अर्जांमध्ये पदस्थापना बदलाची विनंती करण्यात आली होती; परंतु जिल्हा परिषद स्तरावरून पदस्थापनेत बदल करता येणार नसल्याने तसेच संबंधित शिक्षकांना कळविण्यात येत आहे. काही शिक्षकांची पदस्थापना मिळाले नसल्याची तक्रार होती, त्यांना समायोजनात पदस्थापना देण्यात येणार असल्याचे समजते.
१२८ अतिरिक्त शिक्षकांचे रविवारी समायोजन
जिल्हा परिषदेतील १२८ अतिरिक्त शिक्षक, प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापकांचे समायोजन २२ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी ही माहिती दिली.
३० सप्टेंबरचे समायोजन उशिरा झाल्यामुळे १२८ पदे अतिरिक्त झाली होती. अतिरिक्त शिक्षक, प्रा.प. आणि मुख्याध्यापकांच्या याद्या पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आल्या असून जिल्हातंर्गत बदल्यात पदस्थापना न मिळालेल्यांना रविवारी होणाºया समायोजनेत पदस्थापना मिळणार आहे.