बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरातांचे निलंबन होणार रद्द; अजित पवारांचे सुतोवाच...
By सोमनाथ खताळ | Updated: April 2, 2025 13:03 IST2025-04-02T13:01:57+5:302025-04-02T13:03:38+5:30
केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी मांडलेल्या लक्षवेधीस उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी डॉ.थोरात यांच्यावर अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली होती.

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरातांचे निलंबन होणार रद्द; अजित पवारांचे सुतोवाच...
बीड : कोरोना काळात घोटाळा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या निलंबनाची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केली होती. परंतू हे निलंबण चुकीचे असून ते मागे घ्यावे, अशी मागणी आंदोलन करून बीडकरांनी केली होती. हीच माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मिळाली. यावर चुकीचा निर्णय घेऊन कोणावर अन्याय झाला असेल तर असा निर्णय रद्द करण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी केले आहे.
कोरोना काळातील पहिल्या लाटेत डॉ. अशोक थोरात हे जिल्हा शल्य चिकित्सक होते. त्यानंतर डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ.सुरेश साबळे, डॉ.अशोक बडे आदींच्या नियूक्त्या झाल्या. सहा महिन्यापूर्वी डाॅ.थोरात पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आले. त्यानंतर शासकीय रूग्णालयातील प्रसूतीचा टक्का आणि शस्त्रक्रीयांचा आकडाही वाढला होता. सामान्य रूग्णांना तत्पर व दर्जेदार सेवा मिळू लागल्या होत्या, असे असतानाच त्यांच्याविरोधात केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत डॉ.थोरात यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यावरून आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली होती. परंतू, अद्यापही निलंबन आदेश आलेला नाही. तर हे निलंबन मागे घ्यावे, यासाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, आज, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनाही यासंदर्भात निवेदने देण्यात आली. यावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले. जे अधिकारी चांगले काम करत नाहीत, अशांना मी सोडणार नाही. परंतू बीडमधीलच एका अधिकाऱ्याचे चुकीच्या पद्धतीने निलंबन झाल्याची माहिती मला दिली आहे. परंतू असे झाले असेल तर कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, असे सुतोवाच करत पवार यांनी निलंबण मागे घेण्याच्या मागणीला एकप्रकारे हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे डॉ.थोरात हेच पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कायम राहतील, अशा अपेक्षा बीडकरांना आहेत.