आष्टी : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्र्यांनी बीड जिल्ह्यासाठी एक निर्णय आणि इतर जिल्ह्यासाठी वेगळा निर्णय घेऊन कोणती डिस्क्रीएशन पॉवर वापरली? असे प्रश्न निर्माण होत आहेत. सुस्थितीत असलेल्या बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी "हम करे सो कायदा" पद्धतीने केलेली ही रचना असून आम्ही आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नेतृत्वाखाली पॅनेलच्या सर्व प्रमुखांनी एकमताने निर्णय घेऊन निवडणुकीतून बहिष्कार म्हणून माघार घेत असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
ते म्हणाले, सहकार मंत्र्यांनी २ मार्च रोजी परभणी आणि औरंगाबाद जिल्हा बँकेसाठी जो निर्णय दिला. त्याच्या उलट निकाल ३ मार्च रोजी बीड बँकेबाबत दिला आहे. हे परस्पर विरोधी निकाल आणि राजकीय बुद्धीतून लोकशाही प्रक्रियेचा खून केला आहे, असे आ. धस म्हणाले. आमच्या नेत्या पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भीमसेन धोंडे, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, सुभाष सारडा या प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी पक्षाने राजकीय हेतूने हे कृत्य केले असे सांगितले आहे. सध्या बँकेची आर्थिक स्थिती चांगली असून साडेचारशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या ठेवी असून, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी अशी स्थिती असताना नियोजनबद्ध पद्धतीने बँकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. कलम ११ खाली आणण्यासाठी शेतकरी, सभासद ठेवीदारांनी अनेक यातना सहन केलेल्या आहेत. मागील संचालक मंडळाने ६५० कोटी रुपये ठेवी परत केल्या आहेत. आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊन बहिष्कार केलेला आहे. विरोधकांना ८ जागांपैकी २ जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाहीत, असे धस म्हणाले.