बीड : अनेक वर्षांपासून बीडकरांचेरेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. १७ सप्टेंबर रोजी बीडमधून रेल्वे धावणार असून, या ऐतिहासिक क्षणामागे स्थानिक नागरिक, तरुणांचा मोठा संघर्ष दडलेला आहे. विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या अथक प्रयत्नांमुळे हा रेल्वे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर पोहोचला आणि त्यातूनच हा मार्ग मोकळा झाला.
मागील ५० वर्षांपासून बीडमध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. रेल्वे काम वेगाने करावे, निधी द्यावा या मागणीसाठी तरुणांनी एकत्र येऊन विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीची स्थापना केली. या समितीने मोर्चे, उपोषणे आणि निदर्शने अशा अनेक मार्गांनी आंदोलने केली. यापैकी सर्वात महत्त्वाचं आंदोलन बीडच्या आकाशवाणी केंद्रावर ३१ जानेवारी रोजी २००७ रोजी झाले होते. या आंदोलनात युवक क्रांती दल, एआयएसएफ, एसएफआय, संभाजी ब्रिगेड, छावा यांसारख्या अनेक संघटनांचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी आकाशवाणी केंद्रावर तोडफोड झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज करत १७ युवकांना ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे बीडच्या रेल्वे प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले. रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, सचिव संगमेश्वर आंधळकर, उपाध्यक्ष अंबादास आगे, स्व. अमोल गलधर, सुशीला मोराळे, पंडित तुपे, शैलेश जाधव, संजय सावंत, ज्योतीराम हुरकुडे, पंकज चव्हाण, गणेश उगले, गंगाधर काळकुटे, अशोक तावरे, वैभव काकडे आणि इतर अनेक तरुणांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले. मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवस आमरण उपोषण केले आणि विविध ठिकाणी मोर्चे काढले.
आंदोलनामुळे घेतला निर्णयआकाशवाणी केंद्रावरील आंदोलन संदर्भाने तत्कालीन पालकमंत्री स्व. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी बीड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च राज्य सरकार देईल, असे लेखी पत्र दिले. या पत्रामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आणि रेल्वे कामाला वेग आला. सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर यांनी सांगितले की, आज बीडमध्ये रेल्वे सुरू होण्यामागे या विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचा संघर्ष आणि तरुणांचे मोठे योगदान आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गएकूण लांबी : २६१.२५ किलोमीटरभूसंपादन : १८२२.१६८ हेक्टरप्रकल्पाची किंमत : ४८०५.१७ कोटी रुपये (केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी २४०२.५९ कोटी रुपये हिस्सा)पुलांची संख्या : १३० (रेल्वेखालील), ६५ (रेल्वेवरील), ६५ (मोठे पूल), ३०२ (छोटे पूल)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बीड स्थानकावरुन रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावे बीडकरांनी रेल्वेत बसून स्वप्नपूर्तीचा अनुभव घेतला.