दिंद्रुड (बीड) : बीड-परळी महामार्गावर दिंद्रुडजवळ बांधकाम चालू असलेल्या एका नवीन पुलाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा कवच नसल्यामुळे एका ३८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिंद्रुड नजीक झालेल्या या अपघातात निशांत सोनवणे (वय ३८, रा. कासारी, ता. धारूर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
निशांत सोनवणे हे मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दिंद्रुडकडे जात असताना, दिंद्रुड जवळील इंग्लिश स्कूलसमोर हायवेवर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाला त्यांची दुचाकी धडकली. त्यानंतर अपघातात जखमी झालेले निशांत आणि त्यांची दुचाकी पूलाजवळील खड्ड्यात पडल्यामुळे रात्रीच्या वेळेस रहदारी करणाऱ्यांना ते दिसले नाहीत. तब्बल २० तासांनंतर, म्हणजेच बुधवारी (१९ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, शाळकरी मुलांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने शिक्षकांना व शिक्षकांनी दिंद्रुड पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्यासह पथकाने धाव घेतली आणि मृतदेह खड्ड्यातून वर काढला. त्यानंतर मयताची ओळख पटली. परळी ते बीड राज्य महामार्गाचे काम सध्या चालू आहे. परंतु, दिंद्रुड येथे चालू असलेल्या पुलाच्या कामाला सुरक्षा कठडे, दिशादर्शक बोर्ड किंवा दिवे लावलेले नव्हते, असा स्थानिकांचा आरोप आहे. "जर पुलाचे काम सुरू असताना योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या, तर निशांत यांचा जीव वाचला असता.", असा संताप स्थानिकांनी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केला. दिंद्रुड पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.