अजितदादांच्या संकल्पनेतील बीड विमानतळ प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रत्यक्ष कामाची वाट मोकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:41 IST2026-04-07T16:40:12+5:302026-04-07T16:41:45+5:30

बीडच्या विमानतळाचे स्वप्न झेपावणार; ४०.५३ लाखांच्या निधीतून प्राथमिक मूल्यांकन

Beed Airport project conceived by Ajitdada Pawar reaches an important milestone; Technical survey completed | अजितदादांच्या संकल्पनेतील बीड विमानतळ प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रत्यक्ष कामाची वाट मोकळी

अजितदादांच्या संकल्पनेतील बीड विमानतळ प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रत्यक्ष कामाची वाट मोकळी

बीड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाच्या हालचालींना आता वेग आला आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टिकोनातून सुरू असलेल्या या प्रकल्पाचा ‘पूर्व-व्यवहार्यता अभ्यास’ आणि तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, यामुळे विमानतळाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या विमानतळासाठी आवश्यक असलेला पूर्व-व्यवहार्यता अभ्यास ६ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या कामासाठी ४०.५३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. या अभ्यासामुळे विमानतळ विकासासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि भौगोलिक बाबींचे प्राथमिक मूल्यांकन झाले असून, पुढील कामांची दिशा निश्चित झाली आहे.

सुरक्षेसाठी ‘ओएलएस’ सर्वेक्षण पूर्ण
विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘ओएलएस’ (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्फेसेस) सर्वेक्षणही आता पूर्ण झाले आहे. यासाठी ४८.४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार २३ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणाद्वारे विमानतळ परिसरातील अडथळ्यांचे अचूक मापन आणि विश्लेषण करण्यात आले आहे. ज्यामुळे भविष्यातील नियोजन अधिक सुरक्षित आणि प्रभावी होणार आहे.

विकासाला मिळणार मोठी चालना
बीडमध्ये विमानतळ झाल्यास जिल्ह्यात विविध विकासकामांना गती मिळणार आहे. यामुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे
पूर्व-व्यवहार्यता अभ्यास : ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण (निधी : ४०.५३ लाख).
सुरक्षा सर्वेक्षण (ओएलएस) : २३ ते २७ मार्च २०२६ दरम्यान पूर्ण (निधी : ४८.४९ लाख).
सहकार्य : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.
फायदा : औद्योगिक विकास, वेगवान दळणवळण आणि स्थानिक रोजगार निर्मिती.

या तीन गावांतील जमीन प्रस्तावित
बीड विमानतळासाठी तालुक्यातील कामखेडा, दगडी शहाजानपूर आणि आहेर चिंचोली या तीन गावांतील ११७.४ हेक्टर शासकीय तर १९१.२८ खासगी अशी ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि केंद्राच्या पथकाने या जागेची पाहणी केली असून, आता तांत्रिक मान्यता मिळाल्याने प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे. यामुळे बीडच्या विमानतळ प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

प्रत्यक्ष कामाला वेग
बीड विमानतळासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षणे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. जमिनीचे प्राथमिक मूल्यांकन झाले असून, तांत्रिक मान्यतेमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला आता लवकरच वेग मिळेल.
- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड

Web Title : बीड हवाई अड्डा परियोजना आगे बढ़ी: तकनीकी सर्वेक्षण पूरा, रास्ता साफ

Web Summary : बीड हवाई अड्डा परियोजना व्यवहार्यता और सुरक्षा सर्वेक्षणों के साथ गति पकड़ रही है। भूमि की पहचान की गई, निर्माण का मार्ग प्रशस्त हुआ। परियोजना से औद्योगिक विकास, बेहतर कनेक्टिविटी और बीड जिले के लिए स्थानीय रोजगार सृजन का वादा किया गया है।

Web Title : Beed Airport Project Advances: Technical Survey Completed, Path Cleared

Web Summary : Beed airport project gains momentum with completed feasibility and safety surveys. Land identified, paving the way for construction. The project promises industrial growth, improved connectivity, and local job creation for Beed district.