बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
By सोमनाथ खताळ | Updated: August 30, 2025 09:55 IST2025-08-30T09:54:21+5:302025-08-30T09:55:22+5:30
बीडजवळील पेंडगाव फाट्यावर भीषण अपघात; सहा जण जागीच ठार, चालकाला अटक

बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
बीड : बीड शहराजवळील सोलापूर–धुळे महामार्गावर पेंडगाव फाटा येथे आज (शनिवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साडेसातच्या सुमारास भरधाव ट्रकने रस्त्याने चालत जाणाऱ्या सहा पादचाऱ्यांना चिरडले.
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बीड शहर व तालुक्यातील शिदोड गावचे रहिवाशी आहेत. शनिवारी पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी ते पायी जात असताना ही घटना घडली. दर्शनासाठी निघालेल्या नागरिकांचा जीव ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच सहाही जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातात मृतांची नावे अशी:
१. दिनेश दिलीप पवार ( २५, रा. माऊलीनगर, बीड)
२. पवन शिवाजी जगताप ( २५, रा. अंबिका चौक, बीड)
३. अनिकेत रोहिदास शिंदे ( २५, रा. शिठोड)
४. किशोर गुलाब तौर ( २१, रा. गेवराई)
५. आकाश अर्जुन कोळसे ( २५, रिलायन्स पंप पाठीमागे, बीड)
६. विशाल श्रीकृष्ण काकडे ( २५, अहिल्यानगर)