धारूर (बीड) : संजय गांधी निराधार योजनेचे शासकीय अनूदान बंद होऊ नये म्हणून केवायसीसाठी आलेल्या निराधारांची ससेहोलपट काही केल्या थांबण्याची चिन्ह नाहीत. यातच तीव्र उन्हात धारूर तहसील कार्यालयामध्ये केवायसीसाठी आलेल्या ७० वर्षीय कमलबाई बाबूराव कसबे यांचा भोवळ आल्यानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी १२ वाजेदरम्यान घडली. प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याच्या संतप्त भावना निराधारांनी व्यक्त केल्या.
तालुक्यातील जहागीर मोहा येथील कमलबाई बाबुराव कसबे या धारूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी केवायसी करण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भर उन्हात आल्या होत्या. कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वृद्ध केवायसी करण्यासाठी आल्याने रांगा लागल्या होत्या. या रांगेत कमलबाई देखील थांबल्या. परंतु, अचानक त्यांना भोवळ आल्याने त्या कोसळल्या. उष्माघात झाल्याचे लक्षात येताच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
वृद्धांची ससेहोलपट कधी थांबणार?तहसील कार्यालयात विविध योजनांच्या केवायसीसाठी वृद्ध भर उन्हात मोठ्याप्रमाणावर येत आहेत. त्यांना येथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कमलबाई कसबे या गलथान व्यवस्थेचा बळी ठरल्या आहेत. प्रशासनाने दक्षता घेऊन काम करावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश दादा कोकाटे यांनी केली आहे. याबाबतीत तहसीलदार श्रीकांत निळे यांना तक्रार करून वृद्ध नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.