दिवसेंदिवस आष्टी नगरपंचायतचा आर्थिक व्यवहार ढासळत असून, त्याचा परिणाम शहरवासीयांना काल अनुभवास आला. शहरात असणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठाच महावितरण विभागाने थकीत बिलामुळे खंडित केला. याबाबत महावितरणला थकीत बिलाची रक्कम विचारली असता ती तब्बल एक कोटी ६९ लाखांच्या घरात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईमुळे आष्टीकरांना नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. एकतर दोन दिवसांपूर्वी शहरात रात्रीच शिक्षकाचे घर फोडले. सर्वत्र अंधार असल्यामुळे चोरही या संधीचा फायदा घेतात. गेल्या महिनाभरापासून आष्टी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे ह्या रजेवरही गेल्या नाहीत आणि कार्यालयातही आल्या नाहीत. त्यामुळे नगर पंचायतचा कारभार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा झाला आहे, असे म्हणण्याची वेळ आष्टीकरांवर आली आहे. याबाबत नगर पंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांना फोन लावला असता त्यांनी फोन न घेतल्यामुळे बाजू कळू शकली नाही.
शहरातील नगरपंचायतकडे महावितरणचे पथदिव्यांची थकीत बाकी ही जवळपास एक कोटी ५६ लाखांच्या घरात आहे तसेच आष्टी शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विद्युत पंपाची बाकी जवळपास १३ लाखांपेक्षा जास्त असल्याने विद्युत पुरवठा आम्हाला खंडित करावा लागला.
-दत्तात्रय दसपुते
(सहाय्यक अभियंता, महावितरण, आष्टी)
याबाबत मला काहीही माहीत नाही. मी जरी कार्यालयीन प्रमुख असलो तरी आर्थिक व्यवहार माझ्याकडे नाहीत. मला कसलीही प्रतिक्रिया विचारू नका आणि मी काही प्रतिक्रिया देणार नाही.
-के. टी. सांवत, कार्यालयीन प्रमुख, नगरपंचायत, आष्टी
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आम्ही नगर पंचायतीला नोटीस देत असून, तरी याबाबत नगर पंचायत कार्यालय कसलीच दखल घेत नसल्याने चार दिवसांपूर्वी आम्ही चौथी नोटीस दिली होती. त्यांनी थकबाकी न भरल्याने आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पाणीपुरवठा व सार्वजनिक दिवाबत्तीचा विद्युत पुरवठा खंडित केला.
- शिवाजी गोरे, लाइनमन, आष्टी