बीडमध्ये तब्बल १२८१ जणांकडे शस्त्र परवाने; २४५ जणांवर गुन्हे दाखल, तरीही कंबरेला बंदूक
By सोमनाथ खताळ | Updated: December 26, 2024 18:21 IST2024-12-26T18:20:32+5:302024-12-26T18:21:41+5:30
एसपींनी माहिती दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच कारवाई नाही

बीडमध्ये तब्बल १२८१ जणांकडे शस्त्र परवाने; २४५ जणांवर गुन्हे दाखल, तरीही कंबरेला बंदूक
बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परभणी, अमरावतीचे उदाहरणे देत सर्वात जास्त बीडमध्ये शस्त्र परवाने दिल्याचा उल्लेख केला. त्या आधीच तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १६ गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची माहिती जिल्हाधिकारी यांना ऑक्टोबरमध्ये पाठवली होती. आता डिसेंबर संपत आला, तरी जिल्हाधिकारी यांच्याकडून यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आज हे लोक बिनधास्त बंदूक लावून फिरत आहेत. त्यातच काही जण हवेत गोळीबार करत असल्याचेही परळीतील घटनेवरून उघड झाले आहे. बीडमध्ये नेमके हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते; परंतु मागील काही वर्षांत पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच जिल्ह्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांनी परवाना घेतल्यावरही गुन्हे करणे सुरूच ठेवले आहेत, अशांकडेही शस्त्र परवाना ठेवला आहे. बीडमध्ये पाेलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यावर अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या सर्वांची यादी बनवली. त्याप्रमाणे जिल्हा विशेष शाखेकडून गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑक्टाेबरमध्येच पाठवला. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही यावर काहीच कारवाई केलेली नाही. ही फाईल सध्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात धूळ खात पडून असल्याचे सांगण्यात आले.
टोळीत कोणाचा सहभाग?
बंदूक परवाना देण्यासाठी राजकीय, पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातीलच काही लोक धावपळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरावीक रक्कम दिली की टक्केवारीने वाटप करून अशाप्रकारचे परवाने दिले जातात. ही टोळी सक्रिय असल्यानेच जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची संख्या एक हजारांवर गेली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे दाखल असतानाही त्यांना परवाना दिला जात आहे.
बारगळ पॅटर्न राबविण्याची गरज
अविनाश बारगळ यांनी बंदूक परवाना रद्दसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला होता. यासाठी एक कर्मचारीही नियुक्त करणार होते. तसेच, जिल्हाधिकारी प्रशिक्षण घेऊन येताच त्यांच्यासोबत या विषयावर बैठकही होणार होती. परंतु, त्याआधीच बारगळ यांची बदली झाली. आता नवीन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनीही अशाच प्रकारचा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.
अधिवेशनातही गाजला मुद्दा
बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी उपस्थित केला. कोणीही उठतंय अन् बंदूक लावून फिरतंय. उठसूठ हवेत गोळीबार करत असल्याचा आरोप केला होता. हे शस्त्र परवाने कोणाच्या शिफारशीवरून देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणीही आ. धस यांनी केली आहे.
परळीत हवेत गोळीबार
परळीत कैलास बाबासाहेब फड (रा. बँक कॉलनी, परळी) याने एका कार्यक्रमाच्या वेळी विनाकारण हवेत फायर केले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परळी शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. असेच प्रकार इतर ठिकाणीही घडलेले आहेत, परंतु त्याचे व्हिडीओ आणि लोक भीतीपोटी पुढे येत नसल्याने हे प्रकरण तेथेच दबल्याची चर्चा आहे.
२९५ प्रस्ताव नाकारले
जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याआधी पोलिसांकडून त्याची खातरजमा केली होती. हे सर्व करून पाठविलेले २९५ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे पाेलिसांवरही संशय व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूला २४५ प्रस्तावांवर निर्णय घेतला जात नसल्याने महसूल विभागही संशयाच्या भोवऱ्यात आहे.
अशी आहे आकडेवारी
एकूण शस्त्र परवाने - १२८१
रद्दचे प्रस्ताव पाठविले - २४५
१ गुन्हा असलेले - १५५
२ गुन्हे असलेले ४०
३ गुन्हे असलेले २०
४ गुन्हे असलेले १७
५ गुन्हे असलेले ३
६ गुन्हे असलेले ५
९ गुन्हे असलेला १
१० गुन्हे असलेला १
१२ गुन्हे असलेला १
१४ गुन्हे असलेला १
१६ गुन्हे असलेला १