'ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा'; जातीअंत संघर्ष समितीचा अंबाजोगाईत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:47 IST2021-07-12T16:46:32+5:302021-07-12T16:47:56+5:30
अंबाजोगाई शहरातील सदर बाजारातून निघून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

'ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा'; जातीअंत संघर्ष समितीचा अंबाजोगाईत मोर्चा
अंबाजोगाई : ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपी डाॅक्टरास अटक करून संबंधित रूग्णालयाचे सीसीटिव्ही फुटेज जप्त करावे या मागणीसाठी अंबाजोगाई येथील जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने बाबुराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१२ जुलै) दुपारी मोर्चा काढण्यात आला.
अंबाजोगाई शहरातील सदर बाजारातून निघून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात बहुजन समाजातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई उपविभागात मागील वर्षभरात स्त्री अत्याचार व दलित अत्याचार वाढलेले असून धनदांडगे व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे आरोपींना अटक होत नाही. पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली असल्यामुळे पिडीतांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपले कायदेशीर कर्तव्य बजावत नाहीत. डॉ. सुहास यादव यास मदत करणारे त्याचे नातेवाईक यांनी वेगवेगळे राजकीय सोंग घेऊन त्याची धरपकड थांबविली त्या सर्व नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अॅट्रॉसिटी गुन्ह्यांबाबत गंभीर इशारे देऊनही गरीबांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलीस व महसुल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने पीडितांवर दबाव येत असल्याचे मागील काही दिवसातील घटनांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. सुहास यादव सह इतर अॅट्रॉसिटीज गुन्ह्यामधील सर्व फरार आरोपींना अटक करुन त्यांचा तपास करा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, ऍड. विलास लोखंडे, अस्मिता ओव्हाळ, आशालता पांडे, चित्रा पाटील, अक्षय भूंबे, विनोद शिंदे, अमोल हातागळे, गुड्डू जोगदंड यांच्यासह जाती अंत समितीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
अॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने दिलेले कवचकुंडल-बाबुराव पोटभरे
अॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने दलितांना संरक्षणासाठी दिलेले कवचकुंडल आहेत.ही कवचकुंडले जर कोणी काढुन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर समाज शांत बसणार नाही.ज्या ज्या वेळी दलितांवर अन्याय अत्याचार होईल.तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.असा इशारा यावेळी बाबुराव पोटभरे यांनी दिला.