बीडमध्ये आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द

By सोमनाथ खताळ | Updated: February 11, 2025 19:35 IST2025-02-11T19:35:04+5:302025-02-11T19:35:43+5:30

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१० शस्त्र परवाने रद्द; तर १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर केला आहे.

Arms licenses of 127 more people cancelled in Beed | बीडमध्ये आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द

बीडमध्ये आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द

बीड : पाेलिसांनी प्रस्ताव पाठविलेल्या आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ३१० परवाने रद्द केले आहेत. १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर केला आहे. तसेच आणखीदेखील पोलिसांकडून प्रस्ताव पाठविणे सुरूच असून, हा आकडा ५००च्या घरात जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

जिल्ह्यात १२८१ जणांकडे शस्त्र परवाना होता. अविनाश बारगळ यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेताच ज्या लोकांवर मारहाण, हवेत गोळीबार करणे, शिवीगाळसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा २३२ जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठविली. विधानसभा निवडणुकीमुळे यावर कारवाई झाली नाही. परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने हा मुद्दा समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द, निलंबनाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आतापर्यंत ३१० शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आणखी ५ प्रस्ताव पाठविले असून, १९ जणांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला आहे.

बीडनंतर राज्यभर मोहीम
बीडमधील शस्त्र परवान्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातील माहिती मागवण्यात आले. सर्वच पोलिस अधीक्षक, आयुक्त यांना सूचना करून अनावश्यक परवाने रद्दच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये शस्त्र परवाने रद्द करण्यात आले होते. सध्या ही मोहीम राज्यभर सुरू आहे.

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
जिल्ह्यात चने, फुटाण्याप्रमाणे शस्त्र परवाना दिल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने सर्वात अगोदर चव्हाट्यावर आणले. त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. यामुळे शस्त्र परवान्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यामुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाने रद्दची कारवाई हाती घेण्यात आली. ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला आहे.

१९ जणांच्या प्रस्तावावर आक्षेप
एवढे परवाना रद्द झाल्यानंतरही काही लोक परवान्यासाठी अर्ज करतात. गरज नसतानाही अर्ज करणे, गुन्हा दाखल असणे, अशा विविध कारणांमुळे मागील दीड महिन्यात १९ जणांच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याचा निगेटिव्ह अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना मिळणार नाही, हे निश्चित आहे.

परवाना रद्दची आकडेवारी काय सांगते?
पहिला टप्पा - १००
दुसरा टप्पा - ६०
तिसरा टप्पा - २३
चौथा टप्पा - १२७

Web Title: Arms licenses of 127 more people cancelled in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.