अंबाजोगाईत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:50+5:302021-06-04T04:25:50+5:30
व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अंबाजोगाई : अंबाजोगाईतील अत्यावश्यक सेवेसह इतर व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ...

अंबाजोगाईत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी
व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई : अंबाजोगाईतील अत्यावश्यक सेवेसह इतर व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यापारी बांधवांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून अंबाजोगाई येथील अत्यावश्यक सेवा व इतर व्यावसायिकांची दुकाने ही बंदच आहेत. कोविड-१९ मुळे प्रशासनाने घेतलेले निर्णय योग्य व आवश्यक आहेत. परंतु, कोरोना प्रादुर्भावाची पूर्वीची स्थिती व सद्य:स्थितीमध्ये बराच फरक पडलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्यामुळे खूपच विपरीत परिणाम होत आहेत. या व्यावसायिकांवर व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामी त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तसेच मोठमोठ्या व्यावसायिकांना बँकेची कर्जफेड, दुकानाचे भाडे, लेबर पेमेंट, वीज बिल भरणा यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना आपणास योग्य वाटेल त्या वेळेचे बंधन टाकून व्यवसाय चालविण्यास परवानगी देणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. जर व्यवसाय चालविण्यास परवानगी नाही दिली, तर व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही व विदारक परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसाय चालविण्यास परवानगी दिल्यानंतर प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास ते तयार आहोत. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर व्यावसायिकांनाही वेळेच्या बंधनानुसार व्यवसाय चालविण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती प्रतिष्ठित व्यापारी शामसुंदर सत्यनारायण बजाज, अकबर पठाण आणि अधिकार मरलेचा, आदींसह व्यापारी बांधवांनी केली आहे. निवेदनावर शहरातील अनेक व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.