दारूसाठी ‘तो’ बनला दुचाकीचोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:02 IST2018-10-26T00:00:50+5:302018-10-26T00:02:13+5:30
वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने त्याने दुचाकीचोरीचा व्यवसाय निवडला.

दारूसाठी ‘तो’ बनला दुचाकीचोर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने त्याने दुचाकीचोरीचा व्यवसाय निवडला. चार दुचाकीही चोरल्या. पाचवी दुचाकी चोरण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून जालना व बीडमधील चार दुचाकी जप्त केल्या आहेत. केवळ दारूपायी तो गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे.
किशोर नामदेव केदार (२३, रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. किशोरची परिस्थिती गरीब आहे. तो औरंगाबादला असायचा. धडधाकट असतानाही काम करण्याची मानसिकता त्याची नव्हती. त्यातच मौजमजा करण्याची त्याला सवय होती. जुगार खेळण्यात तो तरबेज होता. तसेच त्याला दारूचेही व्यसन होते. पैशांची गरज भासू लागल्याने आणि नातेवाईक पैसे देत नसल्याने त्याने दीड महिन्यापूर्वी दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. चार दुचाकी चोरल्यानंतर त्या विक्री करून पैसे कमवायचा त्याचा इरादा होता. बुधवारी दुपारीही तो पाचवी दुचाकी चोरण्यासाठी परळीला आला होता. याची माहिती सपोनि दिलीप तेजनकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावून किशोरला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चार दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या तो परळीतील गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, मुंजाबा कुवारे, विष्णू चव्हाण, आसेफ शेख, भागवत बिक्कड, सुग्रिव रूपनर यांनी केली.