कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:39+5:302021-04-11T04:32:39+5:30
माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव ...

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी
माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला,फळे प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत. परंतु माजलगाव बाजार समिती केवळ कडधान्ये खरेदी करत असुन त्यांनी फळे व भाजीपाला खरेदी करावा, अशी मागणी ॲड नारायण गोले यांनी केली आहे.
येथील बाजार समिती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तूर, बाजरी,गहु ,ज्वारी, हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरित पिकांना खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेथी, चुका, पालक, गोबी, वांगे, कांदे, लसून, कोथींबीर, भेंडी, गवार, कारले, दोडके व टरबूज पपई, मोसंबी, लिंबू, खरबूज आदि फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीत भाजीपाला व फळे खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून तो आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यातुन अनेक शेतकऱ्यानी भाजीपाला - फळबागा या शहरात नेऊन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करने तोट्याचे अडचणीचे होत असल्याने व सध्या वारंवार होणाऱ्या लॉकडाऊन मुळे आवश्यक वाहतुक उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला व फळे बागेतच पडून राहिले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील निघत नसल्याने अनेक खाजगी सावकारांचे उतरवठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत . परंतु शासनाचे प्रतिनिधी असनारे पालकमंत्री, आमदार, खासदार व बाजार समितीतील पदाधीकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत आहेत .
माजलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करुन तात्काळ खरेदी व विक्री करुन शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या भाजीपाला व फळांची जबाबदारीने व हमीभावात तात्काळ खरेदी सुरु करावी. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जंयती दिवशी सकाळी ११ वाजता बाजार समितीचे आवारात भाजीपाला व फळे यांचे बाजार समितीस तोरण बांधुन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती करुन आसुड आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, लहु सोळंके, राजाभाउ घायतिडक, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, सिद्धेश्वर गायकवाड, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, राजेभाऊ जाधव, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, यांच्यासह आदींनी केले आहे.