लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:53 IST2025-02-26T19:53:17+5:302025-02-26T19:53:51+5:30

सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

After the written assurance by Superintendent of Police, Massajog villagers called off their food giving up movement by giving a deadline of 10 days | लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

केज ( बीड): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी 9 मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात यासाठी मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या सहभागाने देशमुख कुटुंबीय व गावकऱ्यांनी सुरु केलेले सामूहिक अन्नत्याग आंदोलन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मागे घेण्यात आले. मात्र, लेखी आश्वासन दिलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे. खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आंदोलकांनी हस्ते शरबत घेऊन आंदोलन मागे घेतले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची क्रूर हत्या केल्या प्रकरणी गावाकऱ्यांनी प्रशासनाकडे 9 मागण्याचे निवेदन सादर केले होते. व मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून महादेव मंदिरा समोरील प्रांगणात महिलांच्या सहभागाने, देशमुख कुटुंबीय व गावाकऱ्यांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन बुधवारी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची बातमी आंदोलनकर्त्यांना मिळाली. 

दरम्यान, खा बजरंग सोनवणे यांनी आंदोलन स्थळाहून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना कॉल करुन आंदोलनाचे गांभीर्य सांगितले. 9 पैकी पोलीस अधीक्षक यांच्या कक्षेत येणाऱ्या 4 मागण्या या मस्साजोग  ग्रामस्थांचे सविस्तर निवेदन मिळाल्यानंतर 8 दिवसात मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासनाचे पत्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांनी दिले. खा बजरंग सोनवणे आणि आ सुरेश धस हे ही मस्साजोग मध्ये दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आ. धस, खा. सोनवणे या तिघांनीही आंदोलक ग्रामस्थांसोबत संवाद साधला. पोलीस अधीक्षक यांचे आश्वासनाचे पत्र वाचून दाखविल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी १० दिवसांची मुदत देत खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते शरबत देऊन सायंकाळी सहा वाजन्याच्या दरम्यान अन्न त्याग आंदोलन मागे घेतले.

१० दिवसांची मुदत
पोलीस अधीक्षक यांच्या कक्षेतील चार मागण्या दहा दिवसात मान्य न झाल्यास पुन्हा गावकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी यावेळी दिला. तर गावकऱ्यांचा अंत पाहू नका. गुन्हेगार हे पोलीस यंत्रनेतील असोत की खाजगी क्षेत्रातील असोत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. दहा दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा नसता, यापुढे तालुक्यातील अनेक गावे अन्नत्याग आंदोलनात सहभागी होतील असा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला.

Web Title: After the written assurance by Superintendent of Police, Massajog villagers called off their food giving up movement by giving a deadline of 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.