बीड : परळी मतदरसंघातून विजयी झालेले धनंजय मुडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी जिल्हयातून कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्कंठा लागून आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयराजे पंडित यांच्या नावाची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयराजे पंडित आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके विजयी झाले. भाजपचे आष्टीतून सुरेश धस आणि केजमधून नमिता मुंदडा तर शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे बीडमधून विजयी झाले. सध्या भाजपकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे तीन आमदार आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषद सदस्या आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच दोन कॅबीनेट मंत्री मिळाले होते; परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा मास्टरमाईंड असल्याचे सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषाराेपपत्रातून सिद्ध झाले. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला. त्यामुळे एक मंत्रीपद रिक्त झाले आहे.
प्रकाश सोळंकेंकडे अनुभवमाजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांच्याकडे आमदारकीसह मंत्रीपदाचा अनुभव आहे. मागील वेळी त्यांनी मंत्रीपदासाठी बंडही पुकारले होते. यावेळीही आपली शेवटची टर्म म्हणून त्यांच्याकडून मंत्रीपदाची मागणी केली जावू शकते. सरपंच हत्या प्रकरणात आ.सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
पंडित पहिल्यांदाच आमदारगेवराई मतदार संघातून विजयराजे पंडित हे पहिल्यांदाच विजयी झाले. राष्ट्रवादीचे ते सर्वात तरूण आमदार आहेत. त्यांच्या घरातही मंत्रीपदाचा अनुभव आहे. शिवाय मोठे बंधू माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याकडूनही मंत्रीपदासाठी जोर लावला जावू शकतो. नवीन आणि क्लीन चेहरा म्हणूनही पक्षाकडून विचार होऊ शकतो.