दीड महिन्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:48+5:302021-08-12T04:37:48+5:30
केज : तालुक्यातील कोरेगाव येथे सामाईक पाईपलाईन फोडल्याच्या वादातून तिघांनी झोपेत असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न ...

दीड महिन्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात - A
केज : तालुक्यातील कोरेगाव येथे सामाईक पाईपलाईन फोडल्याच्या वादातून तिघांनी झोपेत असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर दुखापत केली होती. यातील फरार आरोपीच्या तपासी पोलीस पथकाने दीड महिन्यानंतर मुसक्या आवळल्या.
कोरेगाव येथील धनराज युवराज तांदळे व अविनाश विठ्ठल तांदळे या चुलत भावात सामाईक पाईपलाईन केलेली आहे.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून अविनाश तांदळे हा सामाईक पाइईलाईनमधून पाणी घेऊ देत नसल्याने धनराज युवराज तांदळे याने १८ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास पाईपलाईन फोडली. त्याचा राग मनात धरून २० मे २०२१ रोजी धनराज तांदळेसह त्याचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ तोंडे हे घरासमोर झोपलेले असताना रात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान अशोक विठ्ठल नेहरकर, रा. पिसेगाव, ता. केज, अविनाश बाबासाहेब तांदळे, रा. कोरेगाव, ता. केज आणि बप्पा शामराव तोंडे, रा. सोनिमोहा, ता. धारूर या तिघांनी संगनमत करून पाईपलाईन का फोडली, या कारणावरून अशोक विठ्ठल नेहरकर याने धनराज युवराज तांदळे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यात धनराज याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
याबाबत केज पोलीस ठाण्यात धनराज युवराज तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अशोक विठ्ठल नेहरकर, रा. पिसेगाव, ता. केज, अविनाश बाबासाहेब तांदळे, रा. कोरेगाव, ता. केज, बप्पा शामराव तोंडे, रा. सोनिमोहा, ता. धारूर या तिघांविरुद्ध या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील एक आरोपी ९ ऑगस्ट रोजी केजमध्ये आलेला असल्याची माहिती तपासी पोलीस पथकास मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, दिलीप गित्ते आणि मतीन शेख यांनी झडप घालून धारूर रोड येथून आरोपी अशोक विठ्ठल नेहरकर याला ताब्यात घेतले. या प्रकरणी फरार आरोपी ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते व मतीन शेख यांनी परिश्रम घेतले.