तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रेमी युगुलांनी संपवले जीवन; एकाच स्कार्फने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 19:05 IST2021-07-21T19:04:14+5:302021-07-21T19:05:12+5:30
he couple ended their lives in Beed : युवक कोल्हापूर येथे मजुरी गेल्यानंतर विधवा महिलेच्या प्रेमात पडला

तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रेमी युगुलांनी संपवले जीवन; एकाच स्कार्फने घेतला गळफास
केज ( बीड ) : ३ महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी प्रथम प्रेयसीने व त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून कारण अद्याप समजू शकले नाही. आकाश शिवाजी धेंडे व सावित्री अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत असे. दरम्यान, घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले. मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने ( २८) घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगितले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने ही घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे व बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.