बीडमध्ये पालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर छापणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:48 IST2018-07-30T23:47:57+5:302018-07-30T23:48:33+5:30
परवानगीशिवाय बॅनर छापताल तर कारवाई करु, अशी तंबी बीड पोलीस व नगर पालिकेने छपाईदारांना दिली आहे. सोमवारी बीड पालिकेत बैठक झाली. यावेळी छपाईदार, बॅनर लावणारे, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

बीडमध्ये पालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर छापणाऱ्यांवर होणार कारवाई
बीड : परवानगीशिवाय बॅनर छापताल तर कारवाई करु, अशी तंबी बीड पोलीस व नगर पालिकेने छपाईदारांना दिली आहे. सोमवारी बीड पालिकेत बैठक झाली. यावेळी छपाईदार, बॅनर लावणारे, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
बीड शहरात गल्लीबोळ, चौकाचौकात अनाधिकृत बॅनर लावलेले दिसून येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. बॅनरवरुन अनेकवेळा वादही झाले आहेत. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. हाच धागा पकडून सोमवारी बीड पोलीस व नगरपालिकेने छपाईदार, बॅनर लावणारे व राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. यामध्ये त्यांना विविध सूचना करण्यात आल्या.
नियमांचे उल्लंघन करताल तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका व पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.बैठकीस पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक आदींची उपस्थिती होती.
बैठकीस गैरहजर राहणा-यांवर कारवाई
जे छपाईदार नोटीस देऊनही बैठकीस गैरहजर राहिले आहेत त्यांना पुन्हा नोटीस पाठवून त्यांचा परवाना रद्द करावा, अशा सूचना खिरडकर यांनी दिल्या आहेत. आता प्रत्यक्षात यावर खरच कारवाई होते की हे केवळ आश्वासन राहते हे येणारी वेळच ठरवेल.
काय ठरले बैठकीत ?
परवानगी असलेल्या बॅनरचीच छपाईदारांनी छपाई करावी.
बॅनरमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ज्याचे बॅनर आहे तो जबाबदार धरला जाईल.
एखाद्या घरावर बॅनर लावायचे असल्यास घरमालकाकडून एनओसी आणि नगर पालिकेची परवानगी आवश्यक आहे. बॅनर लागल्यापासून ते केवळ ३ दिवस ठेवता येईल. त्यानंतर ठेवल्यास कारवाई होईल.
२ आॅगस्टपासून प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात होणार आहे. अनाधिकृत बॅनर लागल्यास पहिला आरोपी बॅनर लावणारा असेल. दुसरा छपाईदार, तर तिसरा बॅनरधारक असेल.